नशिराबादजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक ; चालकाचा मृत्यू, एक जखमी


नशिराबाद (शनिवार, 31 ऑक्टोबर 2026) : जळगाव-भुसावळ महामार्गावर नशिराबादजवळ मध्यरात्री दोन ट्रकची जोरदार धडक झाली. अपघातात सोयाबीनची वाहतूक करणार्‍या ट्रकचा चालक रमेश यादव यांचा मृत्यू झाला तर दुसर्‍या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला. अपघातामुळे महामार्ग परिसरात एकच खळबळ उडाली.

समोरासमोर धडक ; ट्रकच्या कॅबीनचा चुराडा
मिळालेल्या माहितीनुसार, सोयाबीनने भरलेला ट्रक (क्रमांक एम.एच.40 बी.जी.6287) गुजरातहून नागपूरच्या दिशेने जात असताना नशिराबादजवळ मध्यरात्रीच्या सुमारास या ट्रकची समोरून येणार्‍या दुसर्‍या ट्रकशी जोरदार धडक झाली. दुसरा ट्रक दीपनगर येथून राख घेऊन नाशिकच्या दिशेने जात असल्याची माहिती आहे. दोन्ही ट्रकची धडक इतकी भीषण होती की सोयाबीन वाहतूक करणार्‍या ट्रकच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात चालक रमेश यादव हे ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडले.

एक तासाच्या प्रयत्नांनंतर चालकाला बाहेर काढले
अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला सुरुवात केली. दोन्ही ट्रक बाजूला करण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली.

तब्बल एक तासाच्या प्रयत्नांनंतर केबिनमध्ये अडकलेल्या रमेश यादव यांना बाहेर काढण्यात यश आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू
या अपघातात दुसर्‍या ट्रकचा चालकही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !