भोकर एसबीआय बँकेतील दरोड्याची उकल : निलंबित फौजदाराने कारागृहात रचला कट ; चौकडी सतर्कतेने जाळ्यात

जळगाव तालुका पोलिसांची कारवाई ; 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह 27 किलो सोने व 23 लाखांहून अधिक रोकड जप्त


जळगाव (रविवार, 1 नोव्हेंबर 2026) : बँक कर्मचारी कामात व्यस्त असताना हेल्मेटधारी चौकडीने सिनेस्टाईल प्रवेश करीत पिस्तूल बाहेर काढून शाखा प्रबंधकांसह अन्य कर्मचार्‍यांना धमकावत मारहाण केली व सुरक्षा रक्षकाने प्रतिकार करताच आरोपींनी दहशतीसाठी गोळीबारही केला. अवघ्या काही मिनिटात आरोपी बँकेतील सोने व रोकड लुटून पसार झाले मात्र काही वेळेत दरोड्याची माहिती जळगाव तालुका पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर जिल्हाभरात यंत्रणा अलर्ट करण्यात आली व नाकाबंदी लावून गावोगावी पोलीस पाटलांनाही माहिती कळवून संशयीतांची माहिती पाठवल्यानंतर समन्वयातून चौकडीला बेड्या ठोकण्यात आल्या. विशेष म्हणजे बडतर्फ पोलीस दलातील फौजदार शंकर जासक यानेच कारागृहात असताना दरोड्याची योजना आखल्याचे तपासात समोर आले आहे.

या आरोपींना अटक
अंकुश तुळशीराम पवार (30, चव्हाण, खापरखेडा, ता.खकनार, जि.बर्‍हाणपूर), गजानन राजेंद्र पवार (32, रा.न्यायडोंगरी, ता.नांदगाव, जि.नाशिक), शंकर रमेश जासक (28, रा.मन्यारखेडा, ता.जळगाव/खेडदेवी रोड, जळगाव), अंकुश श्रावण चव्हाण (30, रामदेववाडी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेवर सशस्त्र दरोडा टाकल्यानंतर दुचाकीवरून पसार झालेल्या चौकडीला पोलिसानी नाकाबंदी तसेच नागरिकांच्या सहकार्याने अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या. आरोपीकडून 12 लाख 26 हजार 500 रुपयांची रोकड तसेच 36 कोटी 36 लाख 23 हजारांचे 27 किलो सोन्याचे दागिने, पल्सर (टी.एस.13 ई.आर.5554) व होंडा शाईन (एम.एच.41 बी.वाय.6121) जप्त करण्यात आली. एकूण 36 कोटी 48 लाख 49 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बँकेत टाकला सिनेस्टाईल दरोडा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 2.45 ते 3.15 वाजेच्या सुमारास भोकर येथील एसबीआय बँकेत हेल्मेट व तोंडाला मास्क लावलेले चार अनोळखी इसम शिरले. त्यांनी बँक व्यवस्थापक जयेश राणे यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांना धमकावून जीवे ठार मारण्याची धमकी देत गोळीबार केला व दरोडा टाकला. सुरक्षा रक्षक संदीप कोळी याने प्रतिकार केल्यानंतर बडतर्फ फौजदार असलेल्या जासक या आरोपीने गोळीबार केला.

सतर्कतेचा एक दूरध्वनी अन् आरोपी जाळ्यात
दरोड्यानंतर भोकर महिला पोलीस पाटील यांचे सासरे संजीव पवार यांनी घटनेची माहिती तत्काळ जळगाव तालुका निरीक्षक शशिकांत पाटील यांना कळवली व त्यांनी तातडीने यंत्रणा अलर्ट केली. पोलिसांनी नियंत्रण कक्षाच्या मदतीने आरोपींचा माग काढत विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. आरोपी ज्या दिशेने गेले त्या धरणगाव, चोपडा, अडावद मार्गावर पाळत ठेवण्यात आली.

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
अटकेतील आरोपींविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियमाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे शशिकांत पाटील, एपीआय नयन पाटील, धरणगाव प्रभारी उमाकांत गायकवाड, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, उपनिरीक्षक अतुल वंजारी, जळगाव तालुक्याचे एएसआय सुनील पाटील, हवालदार प्रदीप राजपूत, हवालदार प्रवीण पाटील, हवालदार दीपक चौधरी, हवालदार दिनेश चव्हाण, हवालदार नरेंद्र पाटील, आशिष चौधरी, गुलाब माळी, प्रवीण कोळी, प्रशांत ठाकूर, मिलिंद सपकाळे, दीपक देवरे, गणेश पाटील, तुषार जोशी, चालक अशोक पाटील, बापू कोळी, धरणगावचे हवालदार सत्यवान पवार, मनोज पाटील व ग्रामस्थ सागर कोळी, भगवान कोळी, चेतन पाटील, बन्सी पाटील आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !