निष्पाप लोकांना अटक केली जाणार नाही, गुन्ह्यात जरी नाव असले तर पडताळणी करू : डीवायएसपी अनिल बडगुजर

किनगाव पोलिसांवर दगडफेक प्रकरणी गावात शांतता कमिटीची बैठक


यावल (शनिवार, 31 ऑक्टोबर 2024) : एकाही निष्पाप व्यक्तीला पोलिस अटक करणार नाही, ज्यांची नावे फिर्यादीमध्ये असतील व ते घटनास्थळी नसतील अशा व्यक्तींना पोलीस अटक करणार नाही, ज्या लोकांनी खर्‍या अर्थाने पोलिसांची वाद घातला, दगडफेक केली अशा लोकांनाच पोलीस अटक करतील उगाच अफवांवर विश्वास ठेवून गाव सोडून कोणी जाऊ नका, असे आवाहन फैजपूरचे डीवायएसपी अनिल बडगुजर यांनी केले. ते किनगावात पोलिसांवर झालेल्या दगडफेकच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.

काय आहे प्रकरण ?
किनगाव, ता.यावल या गावातील ग्रामपंचायतीच्या सभागृहात शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये किनगावला धार्मिक स्थळासमोरून संघाचे पतसंचलन नेण्यावरून उफाळलेल्या वादात पोलिसांवर दगडफेक झाली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, किनगाव गावातून एका समुदायाचे लोक चक्क घराला कुलूप लावून गाव सोडून निघून गेलेले आहेत त्यांच्या मनात भीती आहे की, पोलीस त्यांना कारण नसताना अटक करतील. या पार्श्वभूमीवर डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी शांतता समितीची बैठक घेतली.

निष्पाप व्यक्तीला अटक करणार नाही
डीवायएसपी बडगुजर यांनी सांगितले की, आम्ही गुन्ह्यात एकाही निष्पाप व्यक्तीला अटक करणार नाही, ज्यांची नावे फिर्यादीमध्ये संशयीत आरोपी म्हणून आहेत मात्र ते घटनास्थळी हजर नसतील तर त्यांच्यावर अटकेची कारवाई न करता त्यांची आम्ही चौकशी करू, एकाही निष्पाप व्यक्तीला या गुन्ह्यात अडकवले जाणार नाही, अशी शाश्वती आम्ही देत आहोत, असे त्यांनी सांगितले. बैठकीमध्ये उपस्थित नागरीकांना गाव सोडून निघून गेलेल्या कुटुंबांना गावात पुन्हा परतण्याची आवाहन करण्यात आले आहे. जे काही खर्‍या अर्थाने गुन्हेगार असतील, ज्यांनी पोलिसांवर दगडफेक केली असेल त्यांच्यावरच आपण कारवाई करू असे त्यांनी स्पष्ट केले.

यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीमध्ये चंद्रकांत चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नबाब तडवी, बबलु कोळी, समीर तडवी, संजय पाटील, सचिन तडवी, शकील खाटीक,शिलवान अडकमोल, प्रकाश ठाकुर, शेख कामील, सत्तार तडवी, राहुल पाटील, संतोष तायडे, विशाल पाटील, सुरेश महाजन, छगन साळुुंके, अनिल पाटील, ग्रामपंचायातचे प्रशासक आर.ई. विसावळेसह मोठ्या संख्येत सर्वधर्मिय समाजबांधव उपस्थित होते.

अफवांवर विश्वास ठेवू नका
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी याप्रसंगी नागरिकांना सांगितले की, तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका. किनगावच्या घटनेनंतर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. पोलिसांवर विश्वास ठेवा. पोलीस विनाकारण कोणालाच रात्री, अपरात्री जबरदस्तीने पकडून आणणार नाही. जे खरे गुन्हेगार आहेत मात्र त्यांना पोलीस सोडणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !