दुष्काळी परिस्थितीमुळे महिला बचत गटाकडून सक्तीची कर्ज वसुली थांबवा : यावल तहसील प्रशासनाला निवेदन


यावल (शनिवार, 31 ऑक्टोबर 2024) : यावल तहसील कार्यालयामध्ये आडगाव, ता.यावल येथील महिला बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन निवेदन दिले. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे महिला बचत गटाच्या कर्जाची सक्तीने होत असलेली वसुली थांबवण्यात यावी व महिलांना मायक्रो फायनान्स कंपन्या व वित्तीय संस्थांकडून ज्या पद्धतीने कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहेत तो थांबवून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावल तहसील प्रशासनाला निवेदन
यावल तहसील कार्यालयामध्ये बुधवारी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांच्याकडे आडगाव, ता.यावल येथील मोठ्या संख्येत महिला बचत गटाच्या महिला सदस्यांनी एकत्र येऊन निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, आमच्या गावातील महिला सदस्यांनी बँक, मायक्रो फायनान्स कंपनी तसेच इतर वित्तीय संस्थेकडून विविध प्रकारचे कर्ज घेतले आहे.

आम्ही कर्जाचे हप्ते भरण्यास प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत परंतु यंदा आमच्या परिसरात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती पिकांचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबाचे उत्पन्न कमी झाले आहे त्यामुळे रोजगार, घर खर्च, आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत कर्जाचे नियमित हप्ते भरणे आम्हाला अवघड जात आहे. अशा अडचणीच्या काळात कर्ज वसुली प्रतिनिधी आमच्या महिलांकडे येऊन वारंवार हप्ते भरण्यास दबाव टाकत असल्याची तक्रार या महिलांनी या निवेदनातून केली आहे. या दबावामुळे अनेक कुटुंब मानसिक दबावाखाली आलेले आहेत. आर्थिक अडचणीत असताना असा दबाव येत असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काही जणांकडून महिलांना अपमानजनक देखील बोलले जात आहे.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता महिला बचत गटातील महिलांनी घेतलेले कर्ज याला मुदत देण्यात यावी तसेच सदर महिला बचत गटाचे कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी महिलांनी केली. निवेदन देतेप्रसंगी नफिसा तडवी, शबनम तडवी, रुबीना तडवी, सायरा तडवी, नूरजान तडवी, साबेरा तडवी, किस्मत तडवीसह मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !