देवगिरी कल्याण आश्रमातर्फे वाघझिरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

224 रुग्णांनी घेतला लाभ ! मोतीबिंदूच्या आठ रुग्णांवर कांताई नेत्रालयात मोफत शस्त्रक्रिया


भुसावळ (रविवार, 1 नोव्हेंबर 2026) : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देणे, गरजू रुग्णांना मोफत औषधे देणे आणि मोतीबिंदूच्या रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देणेहा महत्त्वपूर्ण उद्देश लक्षात घेऊन देवगिरी कल्याण आश्रम, भुसावळ जिल्हा यांच्या माध्यमातून वाघझिरा (ता. यावल) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

224 रुग्णांची तपासणी
या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण 224 रुग्णांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. तसेच रुग्णांना आवश्यक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले.

या आरोग्य शिबिरात भुसावळ येथील विविध वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञ दहा डॉक्टरांची टीम रुग्णसेवेसाठी उपस्थित होती. यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोगतज्ज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता. डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ला व उपचाराबाबत मार्गदर्शन केले.

शिबिरादरम्यान नेत्र तपासणीसाठी कांताई नेत्रालय, जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. तपासणीमध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या आठ रुग्णांची निवड करून त्यांना कांताई नेत्रालय, जळगाव येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

सेवाभावी डॉक्टरांचा सहभाग
या शिबिरात डॉ.सुवर्णा गाडेकर, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.वृषाली चौधरी, डॉ.प्रमोद चौधरी, डॉ.किशोर भोरे, डॉ.विकास गुळवे, डॉ.निलिमा गुळवे, डॉ. महेश फिरके, भूषण लोखंडे, डॉ.अतुल भंगाळे, डॉ.सूर्यकांत पाटील यांनी वैद्यकीय सेवा दिली. गिरीष महाजन यांनी फार्मासिस्ट म्हणून तर सुनील नारखेडे यांनी औषध वितरणाची जबाबदारी सांभाळली. या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी देवगिरी कल्याण आश्रम, भुसावळ जिल्ह्याच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली. सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !