शेतकर्यांच्या बांधावर सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी
दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेततळ्यांची निर्मिती करा, बांधावर झाडे लावा व जगवा : डॉ.सुरेंद्रसिंग पाटील
भुसावळ (रविवार, 1 नोव्हेंबर 2026) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी लेवाहितवादी चळवळीच्या वतीने शिवपूर कन्हाळे, ता.भुसावळ, जि.जळगाव येथे शेतकर्यांच्या बांधावर जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना धीर देणे, त्यांच्याप्रती सामाजिक बांधिलकी जपणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशासाठी दाखविलेल्या कणखर नेतृत्वाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शेतकर्यांनीही संकटांचा धैर्याने सामना करावा, असे आवाहन लेवाहितवादी चळवळीचे प्रवर्तक श्री. शिशिर जावळे यांनी केले. सध्याच्या कठीण परिस्थितीत शेतकरी मोठ्या संकटातून जात असून, समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने शेतकर्यांना मदतीचा हात द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

भुसावळातील श्री गजानन महाराज पायी दिंडीचे आयोजक संत सेवा मंडळाचे प्रकाश जैस्वाल यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शेतकरी हा समाजाचा महत्त्वाचा आधार असून, तो आज अनेक अडचणींचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना मदत करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ.सुरेंद्रसिंग पाटील यांनी दुष्काळाच्या समस्येवर भाष्य करताना वृक्षतोड आणि जंगल क्षेत्रात होणारी घट याकडे लक्ष वेधले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी प्रत्येक शेतकर्याने आपल्या शेतात शेततळे निर्माण करावे. पावसाळ्यात शेताच्या बांधावर झाडे लावून त्यांचे योग्य संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून राबविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
या कार्यक्रमाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख श्री. देवेंद्रभाऊ वराडे, सरदार वल्लभभाई पटेल पतसंस्थेचे चेअरमन श्री. यशवंतभाऊ पाटील, महालक्ष्मी ग्रुप भुसावळचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मुरलीभाऊ लोखंडे, गजानन भक्त वासुदेव कोल्हे, प्रतिष्ठित शेतकरी मिलिंद धांडे, तुकारामभाऊ खाचणे, सामाजिक कार्यकर्ते बापू महाजन, शंकर भुसे आणि प्रांजल पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकर्यांच्या बांधावर जयंती साजरी करून सामाजिक बांधिलकी, शेतकरी मदत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.


