बामणोदजवळ दुचाकी धडकल्या : पाडळसेतील तरुण ठार, एक जखमी
यावल (रविवार, 1 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील बामणोद या गावाच्या अलीकडे असलेल्या पेट्रोल पंपाच्या जवळ डॉ.जगदीश यांच्या शेताच्या समोर एका दुचाकीला एका अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिल्याने अपघातात पाडळसेतील 26 वर्षीय तरुण हा जागीच ठार झाला तर एक जण हा जखमी झाला. अपघात प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघात हा गुरुवारी घडला.
असा घडला अपघात ?
बामणोद गावाजवळ पेट्रोल पंप असून या पेट्रोल पंपाच्या अलीकडे डॉ.जगदीश यांच्या शेताजवळून दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 ई.एस.3875) याद्वारे रोशन गोपाळ कोळी (26) व सुपडू उर्फ सदाशिव गोपाळ कोळी (22, दोन्ही रा.पाडळसा, ता.यावल) हे विरोदा गावी श्री महर्षी वाल्मीक जयंतीची मिरवणूक पाहण्यासाठी जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने येत जबर धडक दिली. या अपघातामध्ये रोशन गोपाळ कोळी (26) हा ठार झाला तर सुपडू उर्फ सदाशिव कोळी हा जखमी झाला.

अपघात प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पांडुरंग कोळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार संजय झाल्टे करीत आहे.


