जळगाव जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचा महाजनांचा निर्धार ! ; 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा दावा !

जागा वाटपाची 90 टक्के चर्चा पूर्ण ; भाजपचा 6 ते 7 जागांसाठी आग्रह, एक-दोन जागांवरील तिढा लवकरच सुटण्याची शक्यता


जळगाव (शनिवार, 14 नोव्हेंबर 2026) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. जिल्हा बँकेच्या सत्तेवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. महायुतीमध्ये तब्बल 90 टक्के जागांवर एकमत झाले असून, उर्वरित एक-दोन जागांचा तिढाही लवकरच सुटेल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीत 21 पैकी 21 जागांवर महायुतीच विजय मिळवेल, असा ठाम दावाही त्यांनी केला आहे.

जागावाटपावर 90 टक्के एकमत ; उर्वरित जागांवर चर्चा
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील जागावाटपाबाबत माध्यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीमधील चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले की, जागावाटपाच्या जवळपास 90 टक्के वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत. सर्व घटक पक्षांमध्ये चांगले एकमत असून, अत्यंत सामोपचाराने चर्चा सुरू आहे. एक-दोन जागांवर मतभेद असले तरी तेही आज किंवा उद्यापर्यंत दूर होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात इतक्या हसत-खेळत आणि सामंजस्याने जिल्हा बँकेची निवडणूक अन्यत्र झाली नसेल, असे सांगत त्यांनी महायुतीतील समन्वयावर समाधान व्यक्त केले.

21 पैकी 21 जागा जिंकण्याचा विश्वास
महायुतीच्या विजयाबाबत महाजन यांनी मोठा दावा केला. जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्यानंतर सर्व घटक पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील. महायुती म्हणून ही निवडणूक ताकदीने लढवून सर्वच्या सर्व 21 जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचा 6 ते 7 जागांसाठी आग्रह
जागावाटपात भाजपच्या वाट्याला किती जागा येणार, याबाबतही महाजन यांनी भूमिका स्पष्ट केली. निवडणुकीत उमेदवारांची निवड करताना ’इलेक्टिव्ह मेरिट’ अर्थात निवडून येण्याची क्षमता हा निकष महत्त्वाचा असेल. त्यानुसारच जागांचे गणित मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून सुरुवातीपासूनच सहा ते सात जागांची मागणी करण्यात आली आहे मात्र अंतिम निर्णय घेताना एखादी जागा कमी-जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही जागांबाबत पक्षाचा आग्रह कायम असला तरी हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

खडसे-महाजन राजकीय संघर्षामुळे निवडणुकीकडे लक्ष
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रृत आहे. एकनाथ खडसे हे देखील जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुतीकडून सर्व 21 जागा जिंकण्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्ष निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे.

जागा वाटपातील अंतिम समीकरण, उमेदवारांची निवड आणि खडसे-महाजन यांच्यातील राजकीय प्रतिष्ठेची लढाई यामुळे जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक आगामी काळात अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !