मतदान यादीत नाव हा प्रत्येक मतदाराचा अधिकार, हीच भाजपाची भूमिका
भुसावळात गटनेता युवराज लोणारी : भुसावळातील पत्रकार परिषदेत गटनेता युवराज लोणारी : जगन सोनवणेंचा उल्लेख पाकिटमंत्री तर उल्हास पगारेंवर ‘मुद्रा लोण किंग’ म्हणून उल्लेख
गणेश वाघ
भुसावळ (शनिवार, 14 नोव्हेंबर 2026) : भुसावळात एसआयआर प्रक्रियेवरून राजकारण पेटले असतानाच दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याने भुसावळकरांचे निव्वळ मनोरंजन होत आहेत. त्यातच शनिवार, 14 रोजी सायंकाळी भाजपाने पुन्हा मंत्री सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. मंत्री संजय सावकारे यांच्यावर टीका करणार्यांवर टीकेचे बाण चालवण्यात आले तर दहा संघटनांचे महामंत्री जगन सोनवणे यांचा ‘पाकिटमंत्री’ तर शिंदे गटातील नगरसेवक उल्हास पगारे यांचा ‘मुद्रा लोण किंग’ म्हणून आरोप करीत त्यांच्या कार्यपद्धत्तीवर ताशेरे ओढण्यात आले.
दुबार नावे कमी होणार : भाजपाची भूमिका स्पष्ट
गटनेता युवराज लोणारी म्हणाले की, भाजपाने सुरूवातीपासून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जे मतदार स्थलांतरीत आहेत, भुसावळऐवजी अन्य राज्यात वा देशात राहतात अथवा ज्यांची नावे दुबार आहेत, अशा नावांवर हरकती घेण्यात आल्या असून जे मूळ मतदार शहरातील आहेत त्यांची नावे वगळण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक मतदाराचे मतदान यादीत नाव असणे हा आपला अधिकारच असून भाजपाचीदेखील तीच भूमिका आहे व लवकरच नवीन मतदार नोंदणी अभियान सुरू होणार असल्याचे ते म्हणाले. शुक्रवारी विरोधकांनी पत्रकार परिषदेत घेत शिव्यांची लाखोली वाहिल्याचा प्रकार अत्यंत निंदणीय निषेधार्थ असल्याचे सांगत मंत्री संजय सावकारे यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्या अनिल चौधरींना त्यांच्याच भाषेत समजेल या पद्धत्तीने आम्ही उत्तरे दिल्याचे लोणारी यांनी सांगितले.
जगन सोनवणे तर ‘पाकिटमंत्री’ : थेटच क्लीपच ऐकवली
युवराज लोणारी यांनी जगन सोनवणे यांचा उल्लेख पाकिटमंत्री असा करीत नशिराबाद टोल नाक्यावरील खान नामक कंत्राटदाराशी झालेल्या संवादाची यावेळी त्यांनी क्लीप ऐकवली. नंतर या प्रकरणात वादावर कसा पडदा पडला याबाबतही त्यांनी उल्लेख केला. यापूर्वी माजी आमदार संतोष चौधरी यांच्याविषयी सोनवणे यांनी अर्वाच्च भाषेत केलेला संवादही त्यांनी ऐकवत नंतर त्यांनी चौधरींविषयी केलेल्या स्तुतीसुमनांची क्लीप यावेळी माध्यमांपुढे ऐकवत सोनवणे यांच्या बदलत्या भूमिकेवर बोट ठेवले.
उल्हास पगारे तर ‘मुद्रा लोण किंग’
शिंदे गटात गेलेल्या नगरसेवक उल्हास पगारे यांचाही उल्लेख लोणारी यांनी ‘मुद्रा लोण किंग’ असा करीत त्यांच्या कार्यपद्धत्तीवर ताशेरे ओढले. घरकुल योजना ही शासनाची असून त्यासाठी त्यांनी वसुली चालवल्याचा आरोप त्यांनी माध्यमांजवळ यावेळी केला. घरकुल योजनेचा लाभ निकषातील लाभार्थींना देण्यात येणार असून त्यासाठी कुणालाही एक रुपया न देण्याचे आवाहन यावेळी लोणारी यांनी केले.
पगारेंनी केली समाजाची दिशाभूल : सविता मकासरे
माजी नगरसेविका सविता मकासरे म्हणाल्या की, उल्हास पगारे यांनी समाजाची फसवणूक केली आहे. राष्ट्रवादीतून निवडून येवून ते आता शिंदे सेनेत गेले आहेत शिवाय प्रभागात जी काही विकासकामे झाली आहेत ते भाजपाच्या कार्यकाळात मंत्री सावकारे यांच्या नेतृत्वात झाली आहेत. विकासकामांमध्ये त्यांनी काड्या करण्याचा प्रयत्न करू नये तसेच मुद्रा लोणमध्ये त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचा आरोपही मकासरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
शहराच्या विकासावर बोला : ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने केले अंतर्मुख
गेल्या काही दिवसांपासून शिंदे सेनेसोबत अन्य पक्षातील पदाधिकारी विरोधात भाजपा पदाधिकारी अशा पत्रकार परिषदा होत आहेत. यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने शहरात भरदिवसा सुरू असलेले मात्र रात्री बंद असलेले पथदिवे, शहरभर साचलेला कचरा व अपूर्ण असलेल्या अमृत योजनेच्या प्रश्नावर भाजपा पदाधिकार्यांना परखड सवाल केला. विकासावर सत्ताधारी वा विरोधक का चर्चा करीत नाही? या प्रश्नावर गटनेता लोणारी यांनी अमृत योजनेच्या दिरंगाईला जळगावातील एक प्रतिष्ठीत कंपनी कारणीभूत असल्याचे सांगत त्यामुळे भुसावळकर पाण्यासाठी तडफडत असल्याचे सांगत संबंधित कंपनीने 163 कोटींचा दावा पालिकेवर दाखल केल्याचे सांगितले. अमृतचा पहिला व दुसरा टप्पा मंजूर असून कामेही अंतीम टप्प्यात आहे तर भाजपाच्या कार्यकाळात पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगून ते म्हणाले की, जलसंकट ही सर्वांची सामूहिक जवाबदारी असून त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे मात्र विरोधक कधी सभेला येतात तर कधी बहिष्कार टाकतात. 14 लाख लीटरच्या जलकुंभाचे (सम) काम लवकरच सुरू होईल व अमृत योजनादेखील लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यांची होती उपस्थिती
पत्रकार परिषदेला भाजपा शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, नगरसेवक पिंटू कोठारी, राजेंद्र आवटे, किरण कोलते, निकी बत्रा, अल्बर्ट तायडे, सविता मकासरे, सागर चौधरी आदींसह पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
