शंभर रुपये कमिशनने जळगावात तत्काळ तिकीटाची विक्री : स्थानिक संशयीताला आरपीएफकडून अटक


जळगाव (रविवार, 15 नोव्हेंबर 2026) : रेल्वे आरक्षण केंद्रातून तत्काळ तिकीट मिळवून देण्याच्या नावाखाली प्रवाशांकडून प्रति तिकीट शंभर रुपये कमिशन घेऊन रेल्वे आरक्षण तिकीटांचा अवैध व्यापार करणार्‍या तरुणाविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाई केली. दीपक मधुकर निकम (वय 32, रा. सुरेशदादा जैन नगर, गेंदालाल मिल, जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध रेल्वे अधिनियमाच्या कलम 143 अंतर्गत गुन्हा क्रमांक 1366/2026 नोंदविण्यात आला आहे.

तत्काळ तिकीटावर घेतले 100 रुपये कमिशन
शनिवार, 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे आरक्षण केंद्रात अवैध तिकीट व्यापार रोखण्यासाठी आरपीएफकडून गुप्त पाळत ठेवण्यात आली होती. यावेळी आरक्षण कार्यालयातून घाईघाईने बाहेर पडणार्‍या एका संशयिताला कॉन्स्टेबल मनोज कुमार यांनी थांबवून चौकशी केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक हजार पाच रुपयांचे स्लीपर श्रेणीतील तत्काळ आरक्षण तिकीट आढळले.

तिकीटासह दोन आरक्षण अर्ज जप्त
तकीट पीएनआर क्रमांक 300-2960545 असून, 15 नोव्हेंबर रोजी ट्रेन क्रमांक 19005 मधून उधना जंक्शन ते जळगाव असा प्रवास करण्यासाठी ते काढण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच एएसआय प्रशांत साळुंके हे दोन पंचांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचांसमक्ष केलेल्या चौकशीत संशयिताने आरक्षण खिडकी क्रमांक 2 मधून तात्काळ तिकीट मिळवून दिल्याचे आणि संबंधित प्रवाशाकडून 100 रुपये कमिशन घेतल्याचे कबूल केले.

नोटीस देवून आरोपीला सोडले
यानंतर पंचनामा करून संबंधित तिकीट आणि दोन कोरे आरक्षण मागणी अर्ज जप्त करण्यात आले. आरोपीला आरपीएफ पोस्ट जळगाव येथे आणून त्याचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर त्याच्याविरुद्ध 14 नोव्हेंबर रोजी रेल्वे अधिनियमाच्या कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम 35(3) अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !