हतनूर धरणावरील भूकंपमापण यंत्रणा अनेक वर्षांपासून बंदच
रिश्टर स्केलवर 4.5 तीव्रतेची नोंद : नवीन यंत्रणेसाठीचा निधी वर्ग ; आता यंत्रांची प्रतीक्षा
भुसावळ (रविवार, 15 नोव्हेंबर 2026) : जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांना प्रामुख्याने शनिवारी सकाळी 9.15 वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता अधिक नसल्याने कुठेही नुकसान झाले नाही मात्र भूकंपाच्या धक्क्यानंतर नजीकच्या धरणावरील बंद भूकंपमापण यंत्रणेचा प्रश्न पुन्हा नव्याने समोर आला आहे. या यंत्रणेसाठी आवश्यक निधी पाटबंधारे विभागाने वर्ग केल्याची माहिती सूत्रांनी दिली असून आता यंत्रणेची प्रतीक्षा कायम आहे.
वारंवार यंत्रणेत झाला बिघाड
हतनूर धरणावर 1982 मध्ये सेस्मोग्रॉफ ही भूकंपाची तीव्रता मोजण्याची यंत्रणा कार्यान्वित होती मात्र 2005 पासून या यंत्रणेत वारंवार बिघाड झाला. यापूर्वी देखील अनेकवेळा बिघाड झाला मात्र महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात ‘मेरी’च्या माध्यमातून दुरुस्ती झाली. जुन्या प्रकारातील या सेस्मोग्राफ यंत्रणेची आता दुरुस्तीही होऊ शकत नसल्याने नवीन यंत्रणेशिवाय पर्याय नाही. याबाबत ‘मेरी’ने पाटबंधारे विभागाला निधीसाठी पत्र दिले व त्यानंतर पाटबंधारे विभागाने संबंधित यत्रणेला निधी वर्ग केला असून आता यंत्रणेची प्रतीक्षा केली जात आहे. निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती हतनूर धरणाचे अभियंता एस.जी.चौधरी यांनी दिली.
धरणावर भूकंप मापक यंत्राची गरज का ?
धरणाच्या क्षेत्रात पाण्याचा दाब असल्याने 2.0 रिश्टर स्केलचे भूकंप वर्षातून अनेक वेळा होतात. अत्यंत सौम्य स्वरुपाचे भूकंप असल्याने कोणतेही नुकसान होत नाही. 2.9 रिश्टर स्केलवरील भूकंपाची मात्र जाणीव होते. धरण परिसरात 1 ते 1.5 रिश्टर स्केलचे भूकंप वारंवार होत असल्यास भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
भुसावळात तीन वर्षानंतर भूकंपाचे धक्के : जीर्ण इमारतीबाबत प्रशासनाचे मौन
27 जानेवारी 2023 रोजी भुसावळ शहर हे केंद्रस्थान असलेला 3.3 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप झाला. यानंतर पालिकेने सुरक्षिततेचा उपाय म्हणून शहरातील 80 जीर्ण व धोकादायक इमारतींच्या मालकांना 24 तासांत इमारती रिकाम्या करण्याचे किंवा जमीनदोस्त करण्याची नोटीस बजावली मात्र तुरळक कारवाई होवून प्रशासनाने चुप्पी साधली. आजतागायत अनेक जीर्ण इमारती उभ्याच असून भविष्यात पुन्हा भूकंप किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास मोठी हानी होण्याचा धोका असूनही प्रशासनाकडून योग्य कारवाई न होता केवळ कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले गेले जात असल्याने सर्वसामान्यांमधून संतापाची भावना आहे.
