गुन्हा दाखल केल्याच्या रागातून दीपनगरात चार सुरक्षा कर्मचार्‍यांवर हल्ला

12 संशयितांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल


भुसावळ (रविवार, 15 नोव्हेंबर 2026) : कोळसा चोरीला प्रतिबंध केल्याने तसेच गुन्हा दाखल केल्याच्या रागातून दीपनगर केंद्राच्या प्रतिबंधित क्षेत्रातील चौघा सुरक्षा कर्मचार्‍यांवर हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक घटना गुरुवार, 12 रोजी सायंकाळी पाच ते सायंकाळी साडेसहा दरम्यान घडली. या हल्ल्यात फिर्यादी संतोष नथ्थू खैरनार यांच्यासह भैयासाहेब मोरे, शुभम घनगर आणि अमोल राठोड असे चार सुरक्षा रक्षक जखमी झालेत. याकरणी तालुका पोलिसात सहा प्रमुख संशयीतांसह अन्य सहा अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल केल्याचा राग
गुरुवारी सायंकाळी 5 ते 6.30 वाजेच्या तक्रारदार संतोष खैरनार हे सहकार्‍यांसह केंद्राच्या परिसरात गस्त घालत असताना पिंप्रीसेकम गावाच्या शिवारातील औष्णिक केंद्राच्या रेल्वे उड्डाणपुलापासून फुलगावकडे जाणार्‍या रस्त्यावर 500 मीटर अंतरावर संशयीत मनोज विश्वनाथ कोलते, धीरज संजय सोनवणे, प्रथमेश तायडे, बंटी बाबुराव सोनवणे, संजय रवींद्र कोळी, जितेंद्र संजय शिंदे यांच्यासह अन्य सहा अनोळखींनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला.

कोळसा चोरी रोखली, गुन्हा दाखलचा
संशयीतांविरोधात यापूर्र्वी दीपनगर केंद्रात साहित्य चोरी केल्याने भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता शिवाय हा राग तसेच औष्णिक विद्युत केंद्रातून कोळसा व इतर साहित्याची चोरी करता येत नसल्याच्या कारणावरून संशयितांनी सुरक्षा कर्मचार्‍यांवर हल्ला केल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत नमूद केले आहे. तपास हवालदार हेमंत मिटकरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !