अजित पवार अपघात प्रकरण पुन्हा चर्चेत ; रोहित पवारांच्या मफलर पोस्टरने राजकीय वर्तुळात खळबळ !


मुंबई (रविवार, 15 नोव्हेंबर 2026) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ आणि त्यासंदर्भातील अनुत्तरित प्रश्न पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी 16 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचा खुलासा करण्याचे संकेत दिले असतानाच मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर आणि पुण्यातील डेक्कन परिसरात मफलरचे चित्र असलेले पोस्टर झळकले आहेत. या पोस्टरमधील सूचक संदेशामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या पोस्टरवरून रोहित पवारांना खोचक टोला लगावत, 16 तारखेनंतर ते काय सांगतात, हे पाहू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मफलरच्या पोस्टरमुळे राजकीय चर्चेला नवे वळण
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या घटनेच्या कारणांबाबत आणि त्यामागील संभाव्य बाबींबाबत रोहित पवार यांनी यापूर्वीही प्रश्न उपस्थित केले आहेत. आता मुंबई आणि पुण्यात झळकलेल्या पोस्टरमुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोस्टरमध्ये मफलरचे चित्र दाखवण्यात आले असून अजित पवार यांच्या विमान अपघातामागील सूत्रधारांना पाठीशी घालणारा नेता नेमका कोण, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे या पोस्टरमधून नेमक्या कोणत्या राजकीय नेत्याकडे बोट दाखवले जात आहे, याबाबत चर्चा रंगली आहे.

‘16 तारखेनंतर बोलू’ ; मुश्रीफांचा रोहित पवारांना टोला
रोहित पवार यांच्या आगामी पत्रकार परिषदेबाबत हसन मुश्रीफ यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, रोहित पवार हे महान नेते आहेत. त्यांनी कुठलातरी शोध लावला होता. ते मागच्या 10 तारखेलाच काहीतरी स्पष्ट करणार होते. आता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोर त्यांनी मफलर लटकवला आहे. 16 तारखेनंतर ते काय सांगतात, हे पाहू. त्यानंतर आपण यावर बोलू. मुश्रीफ यांच्या या वक्तव्यामुळे रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

16 नोव्हेंबरला दुपारी चार वाजता पत्रकार परिषद
रोहित पवार सोमवार, 16 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित महत्त्वाची माहिती आणि काही मुद्दे समोर आणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पत्रकार परिषदेकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष
पोस्टरवर 16 नोव्हेंबरला कोणता राजकीय बॉम्ब फुटणार?’ असा उल्लेख असल्याने या पत्रकार परिषदेकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, रोहित पवार नेमके कोणते पुरावे किंवा माहिती सादर करणार, याबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नाही.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची शक्यता मुश्रीफांनी फेटाळली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेवरही हसन मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांच्या निधनानंतर विलिनीकरणाचा प्रश्न आता निकाली निघाला असल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांनीही हा विषय निकाली निघाल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही पक्षांची मते वेगवेगळी असल्याने सध्या विलिनीकरणाची शक्यता दिसत नसल्याचे मुश्रीफ यांनी नमूद केले.

अजितदादांच्या कामांना त्यांचे नाव देण्याची मागणी करणार
अजित पवार यांनी राजकीय आणि प्रशासकीय कारकिर्दीत केलेल्या कामांचा गौरव व्हावा, यासाठी त्यांच्या नावाने विविध विकासकामांना नामकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. अजितदादांनी केलेल्या कामांना त्यांचे नाव देण्यास काहीही हरकत नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.

एकीकडे अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार कोणते नवे मुद्दे मांडणार, याची उत्सुकता वाढली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या राजकीय भवितव्याबाबतही चर्चा सुरू आहे. त्यामुळे 16 नोव्हेंबरची पत्रकार परिषद राज्याच्या राजकारणात कोणते नवे वळण आणते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !