भुसावळात सुख-शांती व पर्जन्यवृष्टीसाठी ‘महाकाली मृत्युंजय शिवशक्ती यज्ञाला सुरवात
भुसावळ (बुधवार, 18 नोव्हेंबर 2026) : गेल्या दोन वर्षांपासून भुसावळ शहर आणि तालुक्यात घडणार्या अकाल मृत्यू, खून, तसेच तरुण मुलांच्या आत्महत्येसारख्या दुर्दैवी व चिंताजनक घटनांच्या पार्श्वभूमीवर परिसरात शांतता नांदावी, यासाठी सर्वधर्मीय भाविकांनी एकत्र येत एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. भुसावळ तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन मुबलक पाऊस पडावा आणि सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी, या मुख्य उद्देशाने ‘महाकाली मृत्युंजय शिवशक्ती यज्ञा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक व अध्यात्मिक सोहळा जामनेर रोडवरील महाकाली गजोधारी मंदिर धाम (साईबाबा मंदिरासमोर, भुसावळ) येथे 16 ते 20 नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत होत आहे.
सर्वधर्म समभावाची जपणूक अन् शांततेचा ध्यास
भुसावळ तालुक्यातील अशांतता आणि दुर्दैवी घटनांची मालिका खंडित व्हावी, याकरीता सर्वधर्मसमभाव जोपासत हा यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. यज्ञाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती व्हावी, निसर्गाची कृपा होऊन दुष्काळाचे सावट दूर व्हावे आणि तरुण पिढीला सद्बुद्धी व दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना या सोहळ्यात केली जाणार आहे.
भाविकांना उपस्थितीचे नम्र आवाहन
या पाच दिवसीय यज्ञाच्या पावन प्रसंगी भुसावळ शहर व परिसरातील समस्त नागरिकांनी, सर्वधर्मीय भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मंगळवारपासून महायज्ञास सुरुवात
या महायज्ञास मंगळवारपासून सुरुवात झाली असून रोज सकाळ संध्याकाळ पाच जोडपी या महायज्ञात बसवण्यात येत आहे. या यज्ञात पुजन बालयोगी गेंदानाथ महाराज, धीरज पंडीत, संजय चौधरी, पंडीत गोटू गोरवाळकर, संदीप परचुरे, राजेश जोशी, निलेश कटारीया, राहुल वशिष्ट, प्रशांत परचुरे, गणेश कनोजिया, संतोष गुप्ता, सोनू गुजर, किरण मिस्त्री यांची उपस्थिती आहे. या महायज्ञाचे आयोजन बालयोगी गेंदानाथ महाराज यांनी केले आहे.
