जळगावातील गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाने उडी घेत संपवले जीवन
जळगाव (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गजबजलेल्या गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून अज्ञात तरुणाने उडी घेत जीवन संपवले. ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.
व्यापार्यांसह नागरिकांची गर्दी
मंगळवारी दुपारच्या सुमारास दोन वाजता गोलाणी मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असतानाच, चौथ्या मजल्यावरून अज्ञात तरुणाने अचानक खाली उडी घेतली. जमिनीवर जोरात आदळल्याने हा तरुण गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेनंतर मार्केटमधील व्यापारी आणि नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून गंभीर जखमी अवस्थेतील तरुणाला तत्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जिल्हा रुग्णालय) उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय पथकाने तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.
