रावेर पोलिसांनी पाल गावातून जप्त केला एक लाख 62 हजारांचा गांजा
तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ : पाल गावातील आरोपीविरोधात गुन्हा
रावेर (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : रावेर तालुक्यात गांजाविक्रीचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच रावेर पोलिसांनी धडक कारवाई करत एका संशयिताच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत तब्बल तीन किलो 250 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. बाजारभावानुसार या गांजाची अंदाजे किंमत एक लाख 62 हजार 500 रुपये आहे. या प्रकरणी मेहरबान जहाँगीर तडवी (36, रा.पाल, ता.रावेर, जि.जळगाव) यास अटक करण्यात आली.
ऑल आऊट मोहिमेदरम्यान कारवाई
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मेहरबान जहाँगीर तडवी हा स्वतःच्या मालकीच्या दुचाकीवर गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ साठवून ठेवत आहे. या माहितीच्या आधारे सोमवार, 16 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी रावेर पोलिसांच्या पथकाने मेहरबान जहाँगीर तडवी (वय 36, रा. पाल, ता. रावेर, जि. जळगाव) याच्या राहत्या घरावर छापा टाकला. यावेळी घराच्या प्रवेशद्वारासमोरील जिन्याजवळ विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला तीन किलो 250 ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून त्याची किंमत एक लाख 62 हजार 500 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, हवालदार ईश्वर चव्हाण, हवालदार विशाल पाटील, हवालदार प्रमोद पाटील, हवालदार सुक्या तडवी, हवालदार ईस्माईल तडवी, हवालदार विकार शेख, हवालदार श्रीकांत चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
