जळगाव पोलीस अधीक्षकांनी फिरवली भाकरी : बोदवडसह शनीपेठ निरीक्षकांची अखेर बदली

चार अधिकार्‍यांच्या बदल्या : पोलीस वर्तुळात बदल्यांची चर्चा


गणेश वाघ
भुसावळ (गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026) : बोदवड शहरातील वाढती गुन्हेगारी थोपवण्यास अपयशी ठरल्याचा ठपका बोदवड पोलीस निरीक्षकांवर ठेवत नागरिकांनी मूक मोर्चा काढत पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला होता. अपर पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आश्वासनानंतर नागरिकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले होते. या पार्श्वभूमीवर बोदवड निरीक्षकांसह जिल्ह्यातील चार अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवार, 19 रोजी जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काढले आहेत. पोलीस अधीक्षकांच्या बदलीअस्त्राने अधिकारीवर्गात कमालीची खळबळ उडाली आहे तर कायदा-सुव्यवस्था चोख न राखल्यास व नागरिकांच्या तक्रारी वाढल्यास बदली अटळ असल्याचा संदेश यातून देण्यात आला आहे.

बोदवड निरीक्षकांची बदली : सहा.निरीक्षकांकडे पदभार
बोदवडमधील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने सर्वपक्षीय नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर बोदवड निरीक्षक आशिष मधुकर लव्हंगळे यांची बोदवड येथून बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे आता आर्थिक गुन्हे शाखेची धूरा असेल. बोदवडचे सहा.निरीक्षक विवेकानंद दत्तात्रय राळेभात आता बोदवडचे प्रभारी असतील.

अन्य दोन अधिकार्‍यांच्याही बदल्या
शनीपेठ ठाण्याचे निरीक्षक विशाल प्रभूलाल जयस्वाल यांना अलीकडेच नियंत्रण कक्षात हलवण्यात आले मात्र आता त्यांच्याकडे आता एएचटीयू शाखेचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन सुदाम पाटील यांच्याकडे शनीपेठ पोलीस ठाण्याचा पदभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान, एएचटीयूचा प्रभारी पदभारातून सहा.निरीक्षक माधुरी बोरसे यांची तर शनिपेठ प्रभारी पदभारातून जळगाव शहर निरीक्षक सागर शिंपी यांची मुक्तता करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकार्‍यांनी तातडीने पदभार स्वीकारावा, असे बदली आदेशात नमूद आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !