एलटीटी-छपरा आणि एलटीटी-शालिमारदरम्यान अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या धावणार : ‘जंक्शन’वर गाड्यांना थांबा
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा निर्णय
भुसावळ (गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026) : रेल्वेला उत्सव काळात प्रवाशांची गर्दी वाढल्यानंतर त्यांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), मुंबई ते छपरा आणि एलटीटी मुंबई ते शालीमारदरम्यान अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गाड्यांना भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आल्याने परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
एलटीटी मुंबई-छपरा विशेष रेल्वे
गाडी क्रमांक 01127 ही विशेष रेल्वे शुक्रवार, 20 नोव्हेंबर रोजी रात्री 11.15 वाजता एलटीटी मुंबई येथून सुटून 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.20 वाजता छपरा येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01128 ही 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता छपरा येथून सुटून 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.55 वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, बाराबंकी, गोंडा, मनकापूर, बस्ती, खलीलाबाद, गोरखपूर, देवरिया सदर आणि सिवान येथे थांबे असतील. गाडीला 11 शयनयान, आठ सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.
एलटीटी मुंबई-शालिमार विशेष रेल्वे
गाडी क्रमांक 08059 ही विशेष रेल्वे 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.10 वाजता एलटीटी मुंबई येथून सुटून 22 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता शालीमार येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडगपूर आणि संतरागाछी येथे थांबे असतील. या गाडीला दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, सात वातानुकूलित तृतीय श्रेणी, सात शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक जनरेटर व्हॅन आणि एक गार्ड ब्रेक व्हॅनसह सामान्य द्वितीय श्रेणीचा डबा असेल.
आरक्षणाची सुविधा
गाडी क्रमांक 01127 चे आरक्षण सुरू झाले आहे. तर गाडी क्रमांक 08059 चे आरक्षण 20 नोव्हेंबरपासून संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच रेल्वे संकेतस्थळावर सुरू होईल. अनारक्षित डब्यांची तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे सामान्य दराने उपलब्ध असतील. प्रवाशांना रेलवन अॅपद्वारेही तिकीट काढता येईल.
