चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पाच दुचाकी लांबवल्या : चोरटे रामानंद पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव (गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026) : जळगाव जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून पाच दुचाकी लांबवणार्‍या चोरट्यांना रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे जळगावसह चोपडा, धरणगाव आणि शनिपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. जप्त दुचाकींची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रामानंदनगर पोलीस ठाण्यात बापू दत्तू कोळी यांच्या मालकीची बजाज प्लॅटिना मोटारसायकल (क्रमांक एम.एच.19 बी.ई.8161) ही 9 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री घरासमोरून चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर तपासादरम्यान पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला चोरट्यांबाबत माहिती मिळाली. जळगावच्या कांचननगर परिसरातून निर्मल ठाकूर याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने साथीदार मनोज मोहन रंधे (रा.नशिराबाद) याच्यासह जळगाव शहर, चोपडा शहर, पिंपळा परिसर आणि इच्छादेवी चौकातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. .

पाच दुचाकी जप्त
रामानंद पोलिसांनी मनोज रंधे याला नशिराबाद येथून ताब्यात घेत 16 नोव्हेंबर 2026 रोजी अटक केली. त्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी रिमांडमध्ये घेण्यात आले. या दरम्यान आरोपींकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. जप्त दुचाकींमध्ये बजाज प्लॅटिना (क्रमांक एम.एच.19 बी.ई.8161), विना क्रमांकाची हिरो पॅशन प्रो, बजाज प्लॅटिना, सीडी डिलक्स व टीव्हीएस सीटी 100 (लाल रंग) वाहनाचा समावेश आहे. आरोपींच्या अटकेनंतर रामानंद नगर, चोपडा शहर, धरणगाव आणि शनिपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस कर्मचारी जितेंद्र राजपूत, योगेश बारी, मनोज मराठे, सुभाष धांडे, मुकुंद गवते आणि सागर नन्नवरे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !