भुसावळ-सिकंदराबाददरम्यान 23 नोव्हेंबरला विशेष रेल्वे ; प्रवाशांसाठी अनारक्षित गाडीची सुविधा


भुसावळ (शनिवार, 21 नोव्हेंबर 2026) : दिवाळी, पूजा आणि छठ सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. भुसावळ ते सिकंदराबाददरम्यान एकेरी अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येणार असून, सोमवार, 23 नोव्हेंबर रोजी ही गाडी धावणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01285 भुसावळ-सिकंदराबाद विशेष ही 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता भुसावळ रेल्वेस्थानकातून सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री 10 वाजता सिकंदराबाद येथे पोहोचणार आहे.

या विशेष गाडीला मलकापूर, शेगाव, अकोला, हिंगोली, पूर्णा, नांदेड, मुदखेड आणि निजामाबाद या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. गाडीला 18 सामान्य द्वितीय श्रेणीचे (जनरल) डबे आणि 2 एसएलआर डबे, असे एकूण 20 डबे असतील.

प्रवाशांना या विशेष गाडीचे तिकीट ‘रेलवन’ अ‍ॅपद्वारेही बुक करता येणार आहे तसेच गाडीच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्य संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीईएस अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सणासुदीच्या काळातील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या विशेष रेल्वेसेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !