धुळ्यातील खुनाच्या गुन्ह्यात वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारे त्रिकूट गुन्हे शाखेच्या जाळ्यात
आरोपींना न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी
धुळे (मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026) : खुनाच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या सुमारे एक वर्षापासून पसार असलेल्या तीन आरोपींना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. सातत्याने शोध घेऊन पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
किरकोळ वादातून केला खून
धुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास फिर्यादी गणेश सिताराम महिराळे (46, रा.दक्षता कॉलनी, गोळीबार टेकडी रोड, सुरत बायपास, धुळे) यांच्या घरासमोर सार्वजनिक जागी आरोपींनी संगनमताने मागील भांडणाच्या कारणावरून फिर्यादीचा मुलगा तेजस गणेश मिहिराळे (20) याच्यावर हल्ला करीत त्यास जबर मारहाण केली तसेच उचलून ओट्यावर आपटल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात 28 ऑगस्ट 2025 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 315/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कलम 3(2)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी पसार होते.
गोपनीय माहितीनंतर आरोपींना अटक
धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला आरोपींबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांना सोमवार, 23 नोव्हेंबर 2026 रोजी अटक करण्यात आली. हर्षल काशिनाथ खैरनार (26), अनुराग किरण जगताप (25), मयूर किरण जगताप (27, तिघेही रा.दक्षता कॉलनी, गोळीबार टेकडी रोड, धुळे) यांना अटक करण्यात आली. आरोपींना धुळे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहा.निरीक्षक दीपक ढोके, पोलीस अंमलदार योगेश चव्हाण, हेमंत बोरसे, नरेंद्रसिंग गिरासे व प्रल्हाद वाघ आदींच्या पथकाने केली.
