भोंदू खरातचे पाय धरणार्या चंद्रकांत पाटलांना रवींद्र धंगेकरांनी डिवचले ! चाकणकरांप्रमाणे राजीनाम्याची केली मागणी
पुणे (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नावही या वादात चर्चेत आले आहे. शिवसेना (शिंदे गटाचे) नेते रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील आणि अशोक खरात यांचा एकत्रीत फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये चंद्रकांत पाटील हे अशोक खरात यांच्या पाया पडताना दिसत असल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. या मुद्यावरून त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
रुपाली चाकणकरांना द्यावा लागला राजीनामा
अशोक खरात याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. खरातसोबत विविध राजकीय नेत्यांचे फोटो आणि कार्यक्रमांमधील उपस्थिती समोर आल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना या प्रकरणाशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता याच मुद्यांवरून धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबाबतही समान निकष लावण्याची मागणी केली आहे.
धंगेकरांचा सवाल; चंद्रकांत पाटलांना वेगळा न्याय का?
रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून सत्ताधार्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशोक खरातसोबतच्या संबंधांवरून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका झाली. खरातसाठी छत्री धरल्याचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. मग अशोक खरात यांच्या पाया पडताना दिसणार्या चंद्रकांत पाटील यांच्याबाबतीत वेगळा निकष का, असा सवाल धंगेकर यांनी उपस्थित केला.
व्यक्ती पाहून निर्णय घेवू नका
‘देवेंद्रजी, न्यायाची भूमिका घेताना व्यक्ती पाहून निर्णय होऊ नये. रुपाली चाकणकर यांच्याबाबतीत जो निकष लावण्यात आला, तोच चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीतही लावला पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली. तसेच चंद्रकांत पाटील यांच्यासाठी खरातने वेगळा टेबल मांडला होता का, असा उपरोधिक प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
बावनकुळेंकडून चंद्रकांत पाटलांची पाठराखण
धंगेकर यांच्या आरोपांनंतर भाजपकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रकांत पाटील यांची बाजू घेत धंगेकरांच्या टीकेला उत्तर दिले. ‘धंगेकर हे रोज कोणत्याही विषयावर राजकीय टीका करतात. चंद्रकांतदादांनी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपले जीवन वाहून घेतले आहे. दादा संस्कारमय जीवन जगले आहेत त्यांच्या आयुष्याचा अभ्यास केला, तर धंगेकर टीका करणार नाहीत,’ असे बावनकुळे म्हणाले. बावनकुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याचा संदर्भ देत त्यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले मात्र धंगेकर यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीबाबत त्यांनी थेट भाष्य केले नाही.
खरात प्रकरणावरून राजकीय संघर्षाला नवे वळण
अशोक खरात प्रकरणात राजकीय नेत्यांसोबतचे फोटो, भेटीगाठी आणि विविध कार्यक्रमांमधील उपस्थिती यावरून सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी रुपाली चाकणकर यांच्याशी संबंधित वादानंतर आता चंद्रकांत पाटील यांचा फोटो समोर आणत धंगेकर यांनी भाजपला स्पष्टीकरण देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
एकीकडे धंगेकर समान निकष लावण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे बावनकुळे यांनी चंद्रकांत पाटील यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे अशोक खरात प्रकरणाला आता नवे राजकीय वळण मिळाले आहे. धंगेकर यांच्या मागणीवर भाजपचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि या फोटोवरून पुढील काळात राजकीय वाद किती वाढतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ‘दिव्यमराठी’ने या संदर्भात ऑनलाईन वृत्त दिले आहे.
