जळगावात नारळ व्यापार्याचे दुकान फोडले
चोर्यांचे सत्र सुरूच : एक लाख 20 हजारांची रोकड लंपास
जळगाव : शहातील नवीन बी.जे.मार्केटमधील नारळ व्यावसायीक अमजद पठाण यांच्या मालकीच्या लकी महाराष्ट्र नारीयल सप्लायर्स या दुकानातून चोरट्यांनी एक लाख 20 हजारांची रोकड लांबवल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर व्यापार्यांमध्ये घबराट पसरली आहे. पाऊस सुरू असल्याने पठाण यांनी बुधवारी रात्री दुकानातच रक्कम ठेवली होती तर चोरट्यांना ही संधी आयती चालून आली. चोरट्यांनी दुकानाचे शटर लोखंडी टॉमीने उचकावून दुकानातील कपाटाचे कुलूप तोडत त्यातील रक्कम लांबवली. गुरुवारी सकाळी सात वाजता व्यापारी पठाण हे दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. जिल्हा पेठ पेालिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर कर्मचार्यांनी धाव घेतली. ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. दरम्यान, शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच चोरट्यांनी आता दुकानांनाही टार्गेट केल्याने व्यापार्यांमध्ये घबराट पसरली आहे.