जळगावात जुन्या वादातून तरुणावर चॉपरने हल्ला : दोघांना बेड्या
जळगाव (बुधवार, 26 ऑगस्ट 2026) : शहरात जुन्या वादातून तरुणावर चॉपरने हल्ला करण्यात आला. ही घटना ळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली.
काय घडले जळगावात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास संविधान चौक, पिंप्राळा हुडको, जळगाव येथे फिर्यादी रईस शेख नूर मोहम्मद (28, व्यवसाय भंगार विक्री, रा. खोली क्र. 20, दूध फेडरेशन, पिंप्राळा हुडको, जळगाव) यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले. रईस शेख यांच्या तक्रारीनुसार, सुमित संजू शेजवळ (रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने जुन्या वादातून हा हल्ला केला. दोघांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशिवरे करीत आहेत.



