कर्णकर्कश आवाज करणार्या बुलेटस्वारांना दणका : जळगावात 26 मॉडीफाईड सायलेन्सर रोलरखाली नष्ट
जळगाव (बुधवार, 26 ऑगस्ट 2026) : शहरात कर्णकर्कश आवाज करणार्या तसेच मॉडिफाईड सायलेंसरचा वापर करून नागरिकांना त्रास देणार्या बुलेटस्वारांवर जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत जप्त करण्यात आलेले तब्बल 26 मॉडिफाईड सायलेंसर रोडरोलरखाली नष्ट करण्यात आले.
विशेष मोहिमेंतर्गत कारवाई
जळगाव शहरात कर्कश आवाज करणार्या आणि मॉडिफाईड सायलेंसरचा वापर करून बुलेट मोटारसायकल चालविणार्यांविरोधात जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही विशेष कारवाई करण्यात आली.



26 सायलेन्सर नष्ट
पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेदरम्यान कर्कश आवाज करणार्या तब्बल 26 बुलेट मोटारसायकलींचे सायलेंसर जप्त करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात जप्त करण्यात आलेले हे सायलेंसर रोडरोलरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले.
नागरिकांना त्रास देणार्यांवर कठोर कारवाई
कर्कश आवाज करणारे अथवा कंपनीच्या मूळ स्वरूपात बदल करून बसविण्यात आलेले मॉडिफाईड सायलेंसर वापरणे टाळावे, असे आवाहन जळगाव पोलिसांनी केले आहे. अशा वाहनांमुळे ध्वनिप्रदूषण वाढून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून कंपनीने निर्धारित केलेले मूळ सायलेंसरच वापरावेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
सुरक्षितता व शिस्तीला जपा
जळगाव पोलिसांकडून अशीच वाहतूक नियमभंगाविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून, कर्कश आवाज करणार्या व नियमबाह्य सायलेंसर वापरणार्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नियमबाह्य सायलेंसरचा वापर टाळा, नागरिकांच्या आरोग्याचा विचार करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, कॉन्स्टेबल रमेश अहिरे, कॉन्स्टेबल अफजल बागवान, कॉन्स्टेबल फिरोज तडवी आदींच्या पथकाने केली.
