साकेगावकरांनी घेतले फिटनेसचे धडे
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी युवकांचा कसून सराव
भुसावळ : शहराजवळील साकेगावातील युवक रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी गत महिनाभरापासून व्यायामाचा कसून सराव करीत आहेत. गावातील फिटनेस ग्रुपला रन भुसावळ रनर्स ग्रुपचे ट्रेनर प्रा.प्रवीण पाटील यांनी फिटनेसचे धडे दिले. जि.प.शाळेच्या मैदानालगत सुरू असलेल्या महामार्ग साईट रोड येथे ‘फिटनेस पॉइंट’ वर सकाळी साडेपाच वाजता युवक वर्ग दररोज व्यायामाचा कसून सराव करीत आहे. व्यायाम करत असताना शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यायाम व्हावा चुकीच्या पद्धतीने व्यायाम झाल्यास व्याधी नको या उद्देशातून जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या पुढाकाराने रन भुसावळ रनचे एक्सपर्ट ट्रेनर प्रा.प्रवीण पाटील यांनी युवकांना वॉकिंग पूर्वी व वॉकिंग नंतर व्यायामाचे धडे दिले याशिवाय पाठीचे, पोटाचे व्यायाम तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी महत्त्वाच्या टीप्स दिल्या.
फिटनेसवर युवकांचा फोकस
डे बाय डे व्यायामात कशा पद्धतीने वाढ करावी या संदर्भात महत्त्वाचा सूचना केल्या. युवक वर्ग दररोज सकाळी दोन ते अडीच तास वॉकिंग, वॉर्मअप, योगा मेडिटेशन या माध्यमातून घाम गाळून फिटनेसवर लक्ष केंद्रित करीत आहे.
प्रसंगी विलास ठोके, आनंद ठाकरे, वासेफ पटेल, अजय चौधरी, धनराज भोई, डॉ.दीपक पाटील, प्रमोद चव्हाण यांच्यासह वयोवृद्ध शालेय मुलं फिटनेस ग्रुपच्या माध्यमातून फिटनेसचे धडे घेत आहे. अजय चौधरी गावातील युवकांनी जास्तीत-जास्त सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्नशील आहेत.
नवीन पूल झाला वॉकिंग पॉईंट
साकेगाव बस स्थानकावर नवीन पुलांची निर्मिती झाली, वाहतूक नसलेल्या या पुलावर साकेगावातील बहुतांश युवक, वयोवृद्ध, लहान मंडळी सकाळ-संध्याकाळ वॉकिंग, व्यायाम तसेच मेडिटेशनचे धडे घेत आहेत तसेच एकंदरीत नवीन पूल साकेगावकरांसाठी व्यायामाच्या दृष्टिकोनातून सोयीचा ठरला आहे.

