भुसावळातील गढूळ पाण्याचा प्रश्‍न पालकमंत्र्यांच्या दरबारात


कालबाह्य यंत्रणेच्या निमित्ताने भुसावळ पालिका करतेय नागरीकांच्या आरोग्याशी खेळ ” बबलू बर्‍हाटे

भुसावळ : भुसावळात गेल्या काही दिवसांपासून गढुळ पाणीपुरवठा होत असलयाने नागरीकांच्या प्रचंड तक्रारी वाढल्या असून गढूळ पाण्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात नियमितपणे अशुद्ध पाणी पुरवठा करणार्‍या पालिकेने आता कालबाह्य यंत्रणेचे कारण पुढे केल्याने शिवसेना पदाधिकार्‍यांनी याबाबतची तक्रार आता थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे करीत या संदर्भात दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

सेना पदाधिकार्‍यांची भेट
यावल, रावेर, वरणगाव, सावदा व इतर क वर्ग नगरपालिकेत सुद्धा पाणीपुरवठा चांगल्या पद्धत्तीने होत असताना ‘अ’ वर्ग भुसावळ पालिकेतर्फे पाणीपुरवठा करणार्‍या जलशुद्धीकरण केंद्राची यंत्रणा कालबाह्य झाल्याचे कारण सोमवारी पाणीपुरवठा अभियंता नितीन लुंगे यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, गणेश पाटील, विशाल पवार, अर्थव जोशी यांनी केंद्रास भेट दिली तेव्हा पुढे केले. भुसावळ शहरातील सर्वच भागात दर महिन्यात दोन तीन वेळेस अनियमित व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे जादा पैसे खर्च करून पाण्याचा जार/बाटल्या विकत घ्याव्या लागत आहेत. कोट्यवधींचा अर्थसंकल्प असणार्‍या भुसावळ पालिकेची जलशुद्धीकरण यंत्रणा सक्षम नसल्याचा जाब यावेळी पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला.

तीव्र आंदोलनाचा इशारा
गढूळ पाण्यामुळे येथील नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर आजारांनी डोके वर काढले आहे. यासर्व बाबतीत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. नवीन केंद्रात साधन सामुग्री लवकर उपलब्ध करून द्यावी व भुसावळकरांना शुद्ध पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात आली असल्याचे शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !