बुलेट स्लीप झाल्याने खडक्याच्या महिलेचा जागीच मृत्यू
मुलगा गंभीर जखमी : रुग्णवाहिकेअभावी मृतदेह रस्त्यावर तासभर पडून
खडका : खडका-किन्ही रस्त्यावर बुलेट स्लीप होवून झालेल्या अपघातात खडका गावातील 48 वषीय महिलेचा गावाजवळच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात मृत महिलेचा 27 वर्षीय तरुण मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातात खडका येथील रहिवासी शोभा जयदेव लोधवाल (48) यांचा मृत्यू ओढवला तर त्यांचा मुलगा हरीष जयदेव लोधवाल (27) हा जखमी झलाा.
अपघातात महिलेचा मृत्यू
डांभुर्णी, ता.पाचोरा येथे लेक-जावयास भेटण्यासाठी शोभा लोधवाल या मुलासह गेल्या होत्या व भेट घेवून त्या जामनेरमार्गे, कुर्हा व किन्ही गावाकडून खडका येथे बुलेट गाडीवर येत असताना किन्ही रोडवर खडका गावाजवळच बुलेट स्लिप होऊन झालेल्या अपघातात शोभा लोधवाल कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा हरीष लोधवाल हा गंभीर जखमी झाला आहे. मृत महिला शोभा लोधवाल यांच्या मुलीचे गेल्या पंधरवड्यातच लग्न झाले होते. नवीन लग्न झाल्यानंतर त्या लेक- जावायास भेटून परत गावाकडे येत होत्या. अगदी गावाजवळच हा अपघात होऊन त्या जागीच ठार झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या अपघातातील जखमी मुलगा हरीष याचाही नुकताच साखरपुडा झाला असून महिन्याने त्याचेही लग्न होणार होते. मोलमजूरी करणार्या या परीवारातील हरीषने गेल्या दीड महिन्यापूर्वीच हौसेखातर बुलेट गाडी घेतली होती. मृत महिलेच्या पश्चात पती, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे. तिन्ही मुलींचे लग्न झाले ओ.
मृतदेह तासभर रस्त्यावर
अपघात घडल्यानंतर ग्रामस्थांनी जखमी हरिषला रुग्णालयात हलविण्यासाठी 108 क्रमांकावर कॉल केला. मात्र भुसावळ व किन्ही आरेाग्य केंद्राकडे रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. यामुळे तासभर मृतदेह व गंभीर जखमी रस्त्यावर पडून होते. जखमीला रीक्षेतून साकेगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात नेण्यात आले तर मृत महिला शोभा लोधवाल यांचा मृतदेह देखील रिक्षेतून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.
गावकर्यांनी घेतली धाव
अपघाताचे वृत्त कळताच खडका येथील पोलिस पाटील सुरतसिंग पाटील, प्रभारी सरपंच अनिल महाजन, ज्ञानेश्वर आमले, जितेंद्र महाजन, बाळू सपकाळे, युवराज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य केले. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, एपीआय अमोल पवार, हेड कॉस्टेबल विठ्ठल फुसे, प्रविण मोरे यांनी भेट देवून पाहणी केली.

