वडगावात बौद्ध स्मशानभूमीत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम


सावदा : तालुक्यातील वडगाव गावातील निंभोरा रोडवरील बौद्ध समाजबांधवांसाठी असलेल्या स्मशानभूमीत वडगाव ग्रामपंचायतीमार्फत अवैधरीत्या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात समाजबांधवांनी तक्रारी केल्यानंतर या प्रकाराकडे ग्रामपंचायत व ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम बंद करून ते अन्य ठिकाणी करण्यात यावे या संदर्भात 22 जून 2020 रोजी बौद्ध समाजातील बांधवांमार्फत ग्रामविकास अधिकारी, वडगाव यांना तक्रार अर्ज देण्यात आला मात्र दखल घेण्यात न आल्याने पुन्हा 10 ऑगस्ट रोजी स्मरणपत्र देण्यात आले व तरीही दखल घेतली न गेल्याने 30 जून रोजी रावेर गटविकास अधिकारी यांना तक्रार करण्यात आली मात्र दुर्लक्ष करण्यात आले.

हा तर भावनेचा प्रश्‍न
भूमापन क्रमांक 324 /अ /1 ही जमीन बौद्ध लोकांच्या स्मशान भूमीसाठी राखीव आहे तसेच या जागेत अनेक दशकापासून प्रेत ही पुरलेले असून बौद्ध बांधवांच्या भावनेचा हा प्रश्न आहे. ही बाब ठावूक असतानाही शौचालयाचे काम करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाची बेफिकिरी
ग्रामसेवकांना आणि सरपंचांना वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांनी यासंदर्भात कोणतेही म्हणणे ऐकून घेतले नाही तर उलट उडवा-उडवीची उत्तरे देत बांधकाम सुरू ठेवण्यात आले, असे आनंदा वाघोदे म्हणाले. सचिन वाघोदे म्हणाले की, ही जमीन फार पूर्वीपासून बौद्ध समाजाच्या अंत्यविधीसाठी देण्यात आली असून यावर सार्वजनिक शौचालय बांधण्याचा ग्रामपंचायतीला कोणताही अधिकार नाही त्या जमिनी सोबत बौद्ध लोकांच्या भावनेचा प्रश्न जुळलेला आहे. सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम हे बौध्द लोकांच्या दफनविधीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी करायला हवे होते, असे सुरेश वाघोदे म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !