भुसावळ रेल्वे स्थानकावर स्टॉलच्या नावाखाली फसवणूक : तिघांविरुद्ध गुन्हा
भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावर स्टॉल देण्याच्या नावाखाली एकाची आठ लाख 20 हजारात फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शेख फकरुद्दीन अल अहमद (जावेद मंजील, दत्त नगर, भुसावळ) यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार राजेश लखोटे, रीता राजेश लखोटे व जावेद खान शफाअत खान (सर्व रा.भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिसात दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा
तक्रारदार शेख यांचे शहरातील खडका रोडवर कापड दुकान असून त्यांचे वडील रेल्वे स्थानकावर वेंडर आहेत. 2016 मध्ये संशयीत आरोपी जावेद खान हा दुकानावर आल्यानंतर त्यांनी रेल्वे कर्मचारी असल्याचे भासवत स्टेशनवर स्टॉल मिळवून देण्याचे आमिष देत लखोटे दाम्पत्याची ओळख करून दिली. लखोटे यांनी आपली पत्नी रीता या भूमिका एजन्सीच्या माध्यमातून रेल्वे स्थानकावर टेंडर घेवून स्टॉल देत असल्याचे भासवत दहा लाखांची मागणी त्यावेळी केली होती व नंतर डिपॉझीटसाठी पाच लाख मागितल्यानंतर पाच लाख रुपये आरटीजीएसद्वारे त्यांना दिले होते व एकूण आठ लाख 20 हजार रुपये आतापर्यंत दिल्यानंतर स्टॉल न मिळाल्याने आपली वरपर्यंत ओळख असल्याचे सांगत आमचे कुणीही काही करणार नाही व तुला खोट्या केसमध्ये अडकवू, अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे करीत आहेत.


