रावेरातून कोरोना होणार हद्दपार
रावेर नगरपालिकेतर्फे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेचा शुभारंभ
रावेर : रावेर शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. या अनुषंगाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या शासनाच्या महत्वपूर्ण योजनेचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला. या योजनेमुळे शहरातील प्रत्येक घरातील सदस्याची तपासणी केली जात असून तपासणी मोहिमेला जनतेतूनदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालिकेचे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन इन्फ्ररेड थर्मामीटर तसेच पल्स ऑक्सीमीटरच्या सहाय्याने तपासणी करीत सून नागरीकांना कोरोना व्हायरसची लक्षणे जाणवल्यास त्यांना कोविड सेंटरला पाठवण्यात येणार आहे.
पालिकेतर्फे तपासणीसाठी दहा पथके तयार
रावेर पालिकेकडून माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेच्या अंमलबजावणीसाठी दहा पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये एक सफाई कर्मचारी तर एक पालिका कर्मचारी असून असे एकूण दहा पथके तयार करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक नागरीकाच्या घरी जाऊन इन्फ्रारेड थर्मामीटर तसेच पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने नागरीकांची तपासणी केली जात आहे.

शहरातील प्रत्येक कुटुंबाची होणार तपासणी
कोरोना व्हायरसचे पेशंट तपासणीसाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या तपासणी मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान असेल तसेच दुसरा टप्पा 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान असेल. यामुळे कोरोना व्हायरस मुळासकट उपटून फेकता येणार आहे.
गरज असल्यास तरच शहरात या : मुख्याधिकारी
रावेर शहरात कोरोना व्हायरस बराच प्रमाणात आटोक्यात आला असून रावेर शहराला लागून असलेल्या गावातील नागरीकांनी गरज असल्यास तरच रावेर शहरात यावे तसेच येताना तोंडाला मास्क लावावा तसेच सोशल डिस्टन्स पाळावे तसेच कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तत्काळ तपासणी करून घेण्याचे आवाहन रावेर नगरपालिकेचे मुख्यधिकारी रवींद्र लांडे यांनी केले आहे.

