भरधाव कारच्या धडकेत जानवेतील दाम्पत्य ठार


सात वर्षीय चिमुकला बचावला तर जन्मापूर्वीच दुसरा आईच्या कुशीत चिमुकला विसावला

अमळनेर : लोंढवे-मंगरूळ गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत तालुक्यातील जानवे येथील दाम्पत्य ठार झाले तर सात वर्षीय चिमुकला बचावला. रविवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. एकीकडे हरीतालिकेची पूजा सुरू असताना सुवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत असताना दुसरीकडे मात्र गरोदर पत्नीला दवाखान्यात घेवून जाणार्‍या पतीसह पत्नीवर काळाने घाला घातल्याने जानवे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली तर जन्माला येण्यापूर्वीच आईच्या कुशीत दुसरा चिमुकलाही विसावल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. अनिल पितांबर वाघ (32) व त्यांची पत्नी सोनाली (28) अशी ठार दाम्पत्याची नावे असून या अपघातात या दाम्पत्याचा सात वर्षीय चिमुकला प्रियांश बचावला आहे.

दवाखान्यातून परतताना काळाचा घाला
चारचाकी चालक असलेले अनिल पितांबर वाघ हे सात महिन्यांच्या गरोदर असलेल्या पत्नीला वैद्यकीय तपासणीसाठी अमळनेर येथे दुचाकी (क्रमांक एम.एच.19-2111) ने मुलगा प्रियांशसह गेले होते. परतीच्या प्रवासात लोंढवे ते मंगरूळ दरम्यान भरधाव येणार्‍या कारने (क्रमांक एम.एच. 18 बी.सी. 2117) ने धडक दिल्याने दाम्पत्य रस्त्याच्या कडेला फेकले जावून अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा प्रियांश हा गंभीर जखमी झाल्याने तयास धुळे येथे हलवण्यात आले. विशेष म्हणजे अवघ्या चार किलोमीटर अंतरावर गाव असताना काळाने घाला घातला. अपघातानंतर कार चालक पसार झाला.

नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा
घटनेची माहिती कळताच जानवे येथील ग्रामस्थांसह नातेवाइकांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. पती-पत्नींचा मृतदेह पाहून आप्तांनी आक्रोश केला. एकुलत्या एक मुलीचा आणि जावयाचा मृतदेह पाहताच सोनालीच्या आईच्या अश्रूंनाा बांध फुटला. अपघातात जखमी झालेल्या प्रियांशच्या दोघा पायांना दुखापत झाली असून त्याच्या धुळ्यात उपचार सुरूआहेत. मृत अनिल वाघ हे दोन भाऊ होते तर एक भाऊ देशसेवेचे रक्षण करून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. घरातील कर्ता पुरूष असलेल्या अनिल वाघ यांच्या जाण्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.


कॉपी करू नका.