पुण्यात विषारी दारूचे तब्बल 15 बळी ; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाई करण्याचे निर्देश
दापोडी, फुगेवाडी, हडपसर, काळेपडळ भागातील घटना ; नागरिकांचा पोलीस प्रशासनावर रोष
Toxic Liquor Claims a Staggering 15 Lives in Pune; Chief Minister Directs Strict Action पुणे (29 मे 2026) : पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मृत्यूंची मालिका सुरू झाली असून आतापर्यंत 15 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक नागरिक विविध रुग्णालयांत गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ या भागांत ही घटना घडली. स्पिरिटयुक्त हातभट्टीची दारू प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी करीत पोलीस प्रशासनावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर
या गंभीर प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी थेट पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन्ही शहरांच्या पोलीस आयुक्तांना समन्वयाने तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करा आणि कोणतीही हयगय करू नका, असे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले आहेत.
यांचा ओढवला मृत्यू
राहुल शरद क्षीरसागर (45, पांढरे मळा, हडपसर), विजय भूकुरलाल शर्मा (45, ससाणे नगर, हडपसर), अरुण डाडर (हडपसर), अशोक रमेश चव्हाण (काळेपडळ), विजय भूकुरलाल शर्मा (पांढरे मळा, ससाणे नगर, हडपसर), राजेश राजपूत (फुगेवाडी), पांडुरंग फुगे (फुगेवाडी), आनंद देसाई (फुगेवाडी), अकबर पठाण (फुगेवाडी), आनंद निकाळजे (फुगेवाडी), सुभाष डिगीकर (पिंपरी), अक्षय अवसरमल (पिंपरी), बाबा शेख (पिंपरी), राजेंद्र राठोड, विजय राठोड अशी मृतांची नावे आहेत.
यांच्यावर गंभीर अवस्थेत उपचार
सुभाष डिगीकर यांच्यावर मेडी पॉईंट हॉस्पिटल तर अक्षय अवसरमल वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कर्नल विरखा सिंगसह आठ अटकेत
या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंग याच्यासह आणखी आठ जणांना अटक केली आहे. आरोपींवर कठोर कलमे लावण्यात आली असून आणखी काही जणांना ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अबकारी विभागालाही तपासात सहभागी करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी रात्रभर शहरातील विविध दारू अडड्यांवर धाडसत्र राबवले. ही विषारी दारू नेमकी कुठे तयार करण्यात आली आणि ती कोणकोणत्या भागात विकली गेली, याचा शोध सध्या घेतला जात आहे. या घटनेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी इतके मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. याशिवाय पुण्यातील काळेपडळ भागात 3 आणि हडपसरमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 48 तासांत आणखी तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अक्षय अवसरमल यांचा मृत्यू झाला, तर सौरभप्पा भंगारी यांचा मेडीपॉईंट रुग्णालयात मृत्यू झाला. भीमाप्पा बसवंत पुजारी यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

