वरणगाव मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करा


विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना माजी नगराध्यक्ष सुनील काळेंचे निवेदन

भुसावळ : जामनेर येथे ग्लोबल सुपरमल्टीप्रपज रुग्णालयाच्या शुभारंभासाठी आलेल्या विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वरणगाव मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यासंदर्भात माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी निवेदन दिले. यावेळी फडणवीस यांनी वर्क ऑर्डर देण्यासाठी प्रधान सचिव यांना वरणगाव मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना देतो, असे आश्‍वासन दिले. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, कामगार नेते मिलिंद मेढे, समाज सेवक इरफान भाई पिंजारी, भाजपा जेष्ठ नेते हाजी अल्लउद्दीन सेठ, अजय पाटील, संजय जैन, शामराव धनगर, शंकर पवार, आकाश निमकर उपस्थित होते.

वरणगावकरांना आठ दिवसाआड मिळतेय पाणी
निवेदनाचा आशय असा की, वरणगाव शहरासाठी 13 सप्टेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री असतांना माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांनी नागरीकांना 24 तास पाणी मिळेल अशी 25 कोटींची योजना मंजूर केली होती. कामाच्या निविदा नगराध्यक्ष सुनील काळे व मुख्यधिकारी शाम गोसावी यांनी 5 जुन रोजी रीटेंडर केले त्यानुसार दोन निविदा आल्या व जे पात्र असतील त्यांना वर्क ऑर्डर देण्यासाठी प्रशासन मुद्दाम वेळ लावत असल्याने नागरीकांना आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याचे नमूद आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वर्क ऑर्डर देण्यासाठी विलंब लागत असून पात्र कंपनीला तत्काळ वर्क ऑर्डर देउन काम सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना करण्यात आली.

ती पाईप लाईन काढण्याची मागणी
माजी नगराध्यक्ष काळे यांनी फडवणीस यांच्याशी चर्चा करताना वरणगाव शहरातून वाहणार्‍या भोगावती नदी पात्रातून दीपनगर वीजनिर्मिती केंद्राने नियम बाह्यपद्धतीने जी पाईपलाईन टाकली त्यामुळे नदीपात्र छोटे झाल्यामुळे नदीच्या शेजारील वसाहतीत पुराचे पाणी शिरते व त्यामुळे मानवी वित्त हानीची भीती व्यक्त केली. ही टाकलेली पाईपलाईन काढून शहराच्या बाहेरून टाकावी, अशी मागणीही करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !