कापूस खरेदीला नोव्हेंबरचा मुहूर्त


जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांची माहिती

रावेर : रावेर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी सुखद बातमी आहे. रावेरसह इतर बंद पडलेले कापूस खरेदी केंद्र पुढील महिन्यापासून सुरू होणार असून यासाठी शासन सकारात्मक असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. शेतकर्‍यांचे खरीप हंगामाचे कापूस उत्पादन सुरू झाले आहे परंतु शासनाचे कापूस खरेदी केंद्र बंद आहे. यावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, लवकरात-लवकर कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी आमचा शासनाकडे तसेच सीसीआयशी पत्रव्यवहार सुरू आहे. जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असेल की, कापूस खरेदी केंद्र लवकर लवकर सुरू व्हावा. पुढच्या महिन्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंत कापूस खरेदी केंद्र सुरू होणार असल्याचा विश्‍वास जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त करीत शेतकर्‍यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.

नुकसानीचे पंचनामे शासनाकडे
रावेर तालुक्यात मागील महिन्यांमध्ये वादळी पावसामुळे 13 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. यावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाला प्राप्त झाले आहे.आम्ही सर्व पंचनामे तत्काळ शासनाकडे पाठविण्यात आल्याने त्यांनी सांगितले. गत 2019 मध्ये रावेरसह जिल्हाभरात शेतकर्‍यांच्या पिकांचे झालेले नुकसान भरपाईची रक्कम आता शासनाकडून जिल्हा प्रशासनाला मिळण्यास सुरुवात झाली असल्याची माहीती देखील जिल्हाधिकारी यांनी दिली.

कापूस उत्पादक शेतकरी वंचित
रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीला रावेर यावल भागातील 700 कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी सीसीआयला कापूस विक्री करण्यासाठी नंबर लावला होता. त्यापैकी 551 शेतकर्‍यांचा सहा हजार 761 क्विंटल कापूस शासनाने खरेदी केला तर 149 शेतकर्‍यांचा खरेदी करण्याचा बाकी होता. तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र 29 जूनपासून बंद आहे. दरम्यान, कापूस खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !