बोरखेडा हत्याकांडाचा लवकरच होणार उलगडा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती : तीन संशयीत ताब्यात घेतल्याची माहिती
रावेर : तालुक्यातील एकाच कुटुंबातील चौघा भावंडांच्या निर्घृण हत्येचा लवकरच उलगडा होईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे व्यक्त केला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी माध्यमांना देत फास्ट ट्रॅक न्यायालयात हा खटला चालवण्यासह पीडीत कुटुंबाला शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देणार असल्याची ग्वाहीदेखील दिली तसेच दोन लाखांच्या मदतीची घोषणा केल्याचे ते म्हणाले. दरम्यान, शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख हे रावेरात येत असून भिलाला कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
एकाच कुटुंबातील चौघांची हत्या
बोरखेडा रस्त्यावरील शेख मुस्तफा शेख यांच्या शेतात महेताब गुलाब भिलाला हे रखवालदार म्हणून असून ते पत्नी आणि पाच मुलांसह (तीन मुले, दोन मुली) राहतात. मध्यप्रदेशात नातेवाईकांचे निधन झाल्याने पत्नी व एका मुलासह गेले असता शेत-शिवारातील घरात दोन मुले आणि दोन मुली घरी होत्या मात्र शुक्रवारी मध्यरात्री ही भावंडे झोपेत असतांनाच अज्ञातांनी कुर्हाडीने चौघा भावंडांची निर्घृण हत्या केली. मृतांमध्ये सविता (14), सुमन (6) या बहिणींसह राहुल (11), अनिल (8) या भावंडांचा समावेश आहे.

पालकमंत्र्यांनी दिली भेट
हत्याकांडानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री मुंबई येथून शुक्रवारी जळगावात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत भिलाला कुटुंबाची भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे आदी मान्यवर होते. पालकमंत्री पाटील म्हणाले की, घटनेनंतर लागलीच पोलिस प्रशासनाने धाव घेत तीन संशयीतांना ताब्यात घेतले असून उद्यापर्यंत हा गुन्हा उघडकीस येईल, असा आपल्याला विश्वास आहे. आपल्या जीवनात आपण अशी घटना पाहिली नसल्याचे त्यांनी सांगत अत्यंत कु्रर पद्धत्तीने हत्या करण्यात आल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात आपली चर्चा झाली असून फास्ट ट्रॅक न्यायालयात हा खटला चालवण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे ते म्हणाले.

