बोरखेड्यातील त्या कुटुंबाला जमिनीसह, घरकुल व शासकीय मदतीचे आदेश
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भिलाला कुटुंबियांची घेतली भेट
रावेर : बोरखेडा हत्याकांडातील (Borkheda Hatyakand) भिलाला कुटुंबियांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दुपारी भेट घेत कुटुंबियांचे सांत्वन केले. मृतांच्या वारस कुटुंबाला शासनाच्या योजनेतून जमीन, आर्थिक मदतीसह घरकुल व जातीचा दाखला व रेशनकार्ड देण्याबाबत जिल्हाधिकार्यांना गृहमंत्र्यांनी निर्देश दिले. हत्याकांड झालेल्या घटनास्थळाची त्यांनी अधिकार्यांकडून माहिती जाणून घेत पाहणीदेखील केली. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
लोकसंघर्षची आदिवासी बांधवांना न्यायाची मागणी
लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे यांनी गृहमंत्र्यांकडे यावेळी पीडीत कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली शिवाय राज्यातील स्थलांतरीत आदिवासींचा सर्वे करून त्यांची पोलिस ठाण्यात नोंद व्हावी, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून दोषी अल्पवयीन असलेतरी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत आदिवासी बांधवांना घरकुल व रेशनकार्डाची मागणी केली. मागणीबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन देण्यात आले.


