माजी मंत्री एकनाथराव खडसे व गृहमंत्र्यांचे गुप्तगू


वाहनातही सोबत केला प्रवास : राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसे म्हणाले, राजकीय चर्चा नाहीच

रावेर : राष्ट्रवादी प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रावेरात भेट घेत गुप्त बैठकही घेतल्याने राजकारणात पुन्हा तर्क-वितर्कांना उधाण आले तर रावेर ते बोरखेडा दरम्यान एकाच वाहनातून प्रवास करीत अनेक विषयांवर चर्चादेखील केली. या पार्श्‍वभूमीवर खडसेंनी वाहनातून प्रवास केल्याच्या व चर्चा केल्याच्या बाबीला दुजोरा दिला मात्र ती चर्चा राजकीय नव्हती तर बोरखेडा घटनेतील पीडीतांना न्याय देण्याची होती, असेही ते म्हणाले.

खडसे म्हणाले, राजकीय चर्चा नाही
माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोमात सुरू आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री शनिवारी बोरखेडा येथे पीडीत कुटुंबाच्या भेटीसाठी आले असता खडसे व त्यांच्यात बर्‍याच वेळ गोपनीय बैठक होवून चर्चा झाली शिवाय दोघांनी एकाच वाहनातून प्रवासही केला. दोन्ही नेत्यांनी रावेरच्या विश्रामगृहात अर्धा तास चर्चा केली व ही भेट पूर्वनियोजित नसल्याने कुणालाच याबाबत पूर्वकल्पना नसलीतरी नंतर ही बाब समोर येताच खळबळ उडाली. दरम्यान, खडसे यांना विचारले असता ते म्हणाले की, बोरखेडा येथे गृहमंत्र्यांची भेट घेतली शिवाय वाहनातूनही आम्ही प्रवास केला व चर्चा केली मात्र चर्चा राजकीय नव्हे तर बोरखेडा घटनेतील पीडीताना न्याय देण्याची होती. राष्ट्रवादी प्रवेशाबाबत छेडले असता त्यांनी पुढे पाहू, असे सांगत अधिक बोलणे टाळले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !