वांजोळा घटनेतील पीडीत कुटूंबाला संरक्षण द्या
भीम आर्मीची गृहमंत्र्यांकडे मागणी : आरोपीला कठोर शिक्षेबाबतही निवेदन
भुसावळ : तालुक्यातील वांजोळा येथे साडेसहा वर्षीय मूकबधीर मुलीवर 14 रोजी अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली मात्र या घटनेनंतर पीडीतेच्या कुटुंबाला आरोपीच्या नातेवाईकांकडून धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याने या कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी भीम आर्मी जिल्हा युनिट जळगावतर्फे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे शनिवारी करण्यात आली. रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे जात असलेल्या गृहमंत्र्यांची जळगाव विमानतळावर भीम आर्मी जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे व पदाधिकार्यांनी भेट घेतली. पीडीतेच्या कुटुंबाला स्थानिक आमदार निधीतून तत्काळ मदत म्हणून 10 लाख रुपये अदा करावे तसेच पीडीत बालिका ही मुकबधीर असल्याने शासनाने पीडीतेच्या शिक्षणाची जवाबदारी घेवून 25 लाख रुपये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अदा करण्याची मागणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा महासचिव श्रीकांत वानखेडे, प्रधान मुख्य जिल्हा संघटक विक्रम, राज्य प्रवक्ता रमाकांत तायडे, जिल्हा सचिव सुपडू सदाशीव, भुसावळ तालुकाध्यक्ष विजय मालविया, भुसावळ तालुका उपाध्यक्ष डॉली वानखेडे, भुसावळ शहराध्यक्ष विक्रांतसिंग राजपूत, भुसावळ उपशहराध्यक्ष आकाश भालेराव, भुसावळ शहर महासचिव भावेश भालेराव उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीचेही निवेदन
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे शेतात चार भावंडांच्या हत्याकांड प्रकरणी पीडीत कुटुंबाच्या भेटीसाठी आलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांची वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी भेट घेत भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे साडेसहा वर्षीय मूकबधीर बालिकेवर अत्याचार करणार्या मंगल भील या आरोपीवर कठोर शासन करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निवेदनावर विजय (बाळा) पवार, दिनेश इखारे, रूपेश साळुंके, विद्यासागर खरात, शुभम सोयंके यांच्या स्वाक्षर्या आहेत.
आरोपींना कठोर शिक्षा करा : दलित पँथर
भुसावळ : तालुक्यातील वांजोळे येथे साडेसहा वर्षीय मूकबधीर बालिकेवर झालेल्या अत्याचार तसेच रावेर तालुक्यातील बोरखेडे येथे आदिवासी कुटुंबातील चौघा भावंडांच्या हत्येचा दलित पँथरने निषेध करीत या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जळगावात केली. या घटनांची सीबीआय चौकशी करून या खटल्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी दलित पँथरने निवेदनाद्वारे केली. निवेदनावर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हाध्यक्ष राजू महाले, जिल्हाध्यक्ष सुदाम सोनवणे यांच्या स्वाक्षर्या आहेत.

