माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा गुरुवारी राष्ट्रवादी प्रवेश !
मुंबईत सुप्रीमो शरद पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश : कार्यकर्तेही जाणार
भुसावळ : भाजपाकडून गेल्या चार वर्षांपासून डावलण्यात येत असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपूसन सुरू आहेत तर घटस्थापनेला ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे भाकीतही वर्तवण्यात आले मात्र खडसेंनी चर्चांना पूर्णविराम देत माध्यमांनी ठरवलेले हे मुहूर्त असल्याचे सांगत वेळ मारून नेली.
राष्ट्रवादी प्रवेशाला गुरुवारचा मुहूर्त
रावेर तालुक्याच्या दौर्यावर आलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशीही त्यांनी बंदद्वार चर्चा करीत एकाच वाहनातून प्रवास केल्याने राजकीय समीक्षकांच्या भुवया उंचावल्या त्यामुळे पुन्हा खडसे व राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाली. खास सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे हे मुंबईत राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. खडसे यांच्यासह त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते व पदधिकारीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. खडसे यांनी मात्र राष्ट्रवादी प्रवेशाबाबाबत माध्यमेच मुहूर्त ठरवत असल्याचे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला.


आधी आमदारकी नंतर मंत्री पद !
खडसेंना राष्ट्रवादीकडून विधानपरीषदेवर आमदार म्हणून घेतले जाणार असून नंतर त्यांना मंत्री पद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. खडसे राष्ट्रवादीत गेल्यास भाजपासाठी हा मोठा धक्का असेल शिवाय जिल्ह्यातील अनेक समीकरणे बदलणार आहे. खडसेंवर प्रेम करणारे व निष्ठावान व विविध पदांवर असलेले पदाधिकारी तुर्त राष्ट्रवादीत प्रवेश करणार नसलेतरी निवडणुकीच्या तोंडावर ते राष्ट्रवादीत जातील मात्र तूर्त ते भाजपात कागदोपत्री पदावर असतील मात्र मनाने खडसेंसोबत असतील, असेही बोलले जात आहे.
