भुसावळातील यावल रस्त्याच्या डागडूजीला सुरूवात
भुसावळ : शहरातील यावल रस्त्याची डांबरीकरणानंतर अल्पावधीत दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत होता. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याची डागडूजी करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात होती शिवाय रस्ता अल्पावधीत खराब झाल्याने लक्ष वेधण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी रस्त्यास श्रद्धांजली वाहून अनोखे आंदोलन केले होते. दरम्यान, रस्त्याच्या दुरवस्थेनंतर ठेकेदाराने सोमवारी डागडूजीला सुरुवात केल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना मनस्ताप
यावल रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली होती मात्र मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मजूर बाहेरगावी गेल्याने रस्त्याचे काम बारगळल्यानंतर ते अखेर जुलै अखेरीस पूर्ण करण्यात आले होते मात्र काम पूर्ण झाल्याच्या काही दिवसात रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सोसावा लागत होता शिवाय किरकोळ अपघातदेखील घडत होते मात्र आता रस्त्याची दुरुस्ती होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.


