भुसावळात वंचित बहुजन आघाडी संघटनेची निदर्शने
भुसावळ : विविध मागण्यांसाठी जामनेररेाडवरील आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी संघटनेने जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वात सोमवारी निदर्शने केली. यावेळी आमदार संजय सावकारेंसह नगराध्यक्ष रमण भोळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मागण्यांसाठी निदर्शने
भुसावळ पालिकेकडे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून घरकुलांसाठी अर्ज केलेल्या लाभार्थींना घरकुल मिळावे, पंचशील नगरातील शौचालयांचे नव्याने बांधकाम करावे, शनीमंदिर व पंचशील नगराला जोडणारा पूल गेल्या दोन वर्षांपासून तोडण्यात आला आहे. तो त्वरीत तयार करण्यात यावा, शिवपूर कन्हाळे रस्त्याची डागडूजी करून पथदिवे बसविण्यात यावे, शहरासह वाढीव वस्त्यांमध्ये नियमित व शुध्द पाणीपुरवठा करण्यात यावा, शहरात दैनंदिन स्वच्छता करण्यात यावी, झोपडपट्टी भागात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाचे सुशोभिकरण करण्यात यावे आदी मागण्यांसाठी वंचीत बहूजन आघाडीने सोमवारी जामनेररोडवरील आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी वंचीत आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी आमदार व नगराध्यक्षांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र सोमवारी आमदार व नगराध्यक्ष जामनेररोडवरील कार्यालयावर उपस्थित झाले व तेथे आंदोलन करण्यात आले. आमदार सावकारे व नगराध्यक्ष भोळे यांनी निवेदन स्विकारुन मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव विनोद इखारे, अरुण तायडे, अरुण नरवाडे, शोभाबाई वाघ, पंकज बोदडे, विलास सुरवाडे, सुरेखा बोदडे आदींसह पंचशील नगरातील रहिवासी उपस्थित होते.


