परसाडेत तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
यावल : तालुक्यातील परसाडे येथील वसीम युनूस तडवी (22) या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. परसाडे येथील किराणा व्यवसाय करणारा वसीम युनूस तडवी हा मंगळवारी घरी एकटा होता तर त्याचे आई-वडील व लहान भाऊ हे बाहेर गावी गेले असल्याने ते दुपारी चार वाजता घरात परतले असता त्यांना वसीमने आत्महत्या केल्याचे आढळले. याबाबत नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली व वसीमचा मृतदेेह ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, डॉ.फिरोज तडवी यांनी शवविच्छेदन केले. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात अतुल भालेराव, अजय भालेराव, ग्रामसेवक मजीत तडवी, फैजपूर प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार रशीद तडवी, आदिवासी कार्यालयातील बबलु तडवी सह नागरीकांनी धाव घेतली. यावल पोलिसात शरीफ तडवी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत हा नायब तहसीलदार रशीद तडवी याचा भाचच होय. मयताच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परीवार आहे. तरुणाने आत्महत्या का केली ? याचे कारण मात्र कळू शकले नाही.

