‘अंतर्नाद’ची ‘एक दुर्वा समर्पणाची’ दशकभराची वाटचाल ; गणेशोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक सेवेची जोड
भुसावळ (सोमवार, 7 सप्टेंबर 2026) : गणेशोत्सव म्हटला की सजावट, रोषणाई आणि विविध कार्यक्रमांवर होणारा मोठा खर्च डोळ्यासमोर येतो. मात्र, याच उत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा अनोखा सामाजिक संदेश देणारा ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम भुसावळ येथील ‘अंतर्नाद प्रतिष्ठान’तर्फे यंदाही राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष असून, गेल्या नऊ वर्षांत हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला या उपक्रमातून आधार मिळाला आहे.
ज्ञानाची दुर्वा समर्पित करण्याची संकल्पना
गणरायाला अर्पण करण्यात येणार्या दुर्वेप्रमाणेच शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून ज्ञानाची दुर्वा समर्पित करण्याची संकल्पना अंतर्नाद प्रतिष्ठानने गेल्या दशकभरापासून जपली आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात अनावश्यक खर्च करण्याऐवजी त्या खर्चातून एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जातो.
2962 गरजू विद्यार्थ्यांना उपक्रमाचा लाभ
गेल्या नऊ वर्षांत भुसावळ, बोदवड, जामनेर, यावल आणि रावेर तालुक्यांतील 38 शाळांमधील तब्बल 2962 गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे. यंदाही ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन शाळांची निवड करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, पेन्सिल, वह्या, पेन, कंपासपेटी, गणवेश, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील आनंदासोबतच गरजू विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरही आनंद फुलविण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जात आहे.
दशकभरापासून उपक्रम
‘एक दुर्वा समर्पणाची’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी रोवली आहे. गेल्या दशकभरापासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. समाजातील दात्यांनी आपल्या परीने शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात मदत करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील, प्रकल्प समन्वयक उमेश फिरके आणि प्रकल्प सहसमन्वयक ललित महाजन यांनी केले आहे.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, डॉ. संजू भटकर, प्रसन्ना बोरोले, जीवन महाजन, शैलेंद्र महाजन, कुंदन वायकोळे, राहुल भारंबे, विक्रांत चौधरी, हितेंद्र नेमाडे, अमित चौधरी, समाधान जाधव, देव सरकटे, राजू वारके, हरीश भट, डॉ. प्रा. श्याम दुसाने, तेजेंद्र महाजन, भूषण झोपे, कपिल धांडे, विपिन वारके, चंद्रकांत सूर्यवंशी, केतन महाजन, शिरीष कोल्हे, प्रमोद पाटील, निवृत्ती पाटील, सचिन पाटील, जीवन सपकाळे, मंगेश भावे, किशोर नेहेते आणि दीपक नेहेते परिश्रम घेत आहेत.

