सण-उत्सवाआधी पोलिसांचा दणका ! जळगाव जिल्ह्यातील 12 सराईत गुन्हेगार हद्दपार
जळगाव (सोमवार, 7 सप्टेंबर 2026) : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 12 आरोपींना एकाच दिवशी तडीपार (हद्दपार) करण्याचे आदेश जारी करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
हद्दपार आरोपींमध्ये नशिराबाद सहा, जिल्हापेठ व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एक, जामनेर पोलीस ठाणे हद्दीतील दोन, फत्तेपूर हद्दीतील दोन अशा 14 आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे. मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 56(1)(ब) अन्वये जिल्ह्यातील 12 सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.
नशिराबाद हद्दीतील सहा संशयीत हद्दपार
नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवेश खान उर्फ काल्या शेख जहांगीर (ईस्लामपूर, नशिराबाद), अताउल्लाह शहा उमानउल्लाह शहा (मोमीन मोहल्ला, नशिराबाद), मुक्तार शहा खलील शहा (मोमीन मोहल्ला, नशिराबाद), अक्रम शहा सादिक शहा (मोमीन मोहल्ला, नशिराबाद), रोहित दिलीप नाथ (नशिराबाद), विपुल गोविंदा नाथ (नशिराबाद) या सहा संशयीतांना हद्दपार करण्यात आले. संबंधितांवर विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
जिल्हापेठ व एमआयडीसीतील प्रत्येकी एक हद्दपार
जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेतन ऊर्फ बटाट्या रमेश सुशीर तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरमान चिंधा पटेल (रामनगर, शेरा चौक, जळगाव) यांना हद्दपार करण्यात आले.
जामनेरमधील दोघांवर सहा महिन्यांसाठी हद्दपार
जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकाश सुभाष शिंदे (सामरोद, ता.जामनेर) व जगन्नाथ रामकृष्ण कोळी (सामरोद, ता.जामनेर) यांच्यावरही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. दोघांना सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याचे पत्रकात नमूद आहे.
फत्तेपूरमधील दोघांवरही कारवाई
फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरी पांडुरंग पाटील (बेटावद, ता.जामनेर) व सोपान अशोक इंगळे (कापूसवाडी, ता.जामनेर) यांनाही हद्दपार करण्यात आले.
सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे पोलिसांचे आवाहन
आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि समाजात दहशत निर्माण करणार्या सराईत गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे हा कारवाईचा उद्देश असल्याचे जळगाव पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही कठोर व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. पागरिकांनी सण-उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

