भुसावळात महसूल कर्मचार्यांच्या काम बंदने तहसीलमध्ये शुकशुकाट

भुसावळ : महसूल कर्मचार्यांच्या बहुतांश मागण्या शासनाने यापूर्वीच तत्वत: मान्यता दिली असलीतरी अद्यापर्यंत त्या संदर्भातला कोणताही शासन निर्णय झाला नसल्याने गुरूवारपासून कर्मचारी संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारल्याने शहराच्या तहसील कार्यालयात गुरूवारी शुकशुकाट दिसून आला. आंदोलनात भुसावळ महसूल विभागाचे 28 कर्मचारी सहभागी झाले. यात तीन नायब तहसीलदारांचा समावेश असल्याचे संघटनेकडून कळविण्यात आले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा पावित्रा संघटनेने घेतला आहे.
या मागण्यांसाठी आंदोलन
महसूल लिपिकांचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक पदनाम देण्यात यावे, नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण 33 टक्केवरून 20 टक्के करावेे, अव्वल कारकुन वर्ग 3 च्या संवर्गाच्या वेतन श्रेणीमधील त्रृटी दूर कराव्यात, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्यात यावी, आकृतीबंद सुधारणा करण्याबाबत दांगट समितीने सादर केलेल्या अहवालानुसार पदे मंजूर करण्यात यावे, अन्य विभागांच्या कामांसाठी नव्याने आकृतीबंद तयार करण्यात यावा या मागण्यांना शासनाने तत्वत: मान्यता दिली आह ेपरंतु शासन निर्णय निर्गमित केले नसल्याने यापूर्वी झालेल्या विविध आंदोलनानंतर आता थेट कामबंद आंदोलन करण्यात आले. निवेदनावर कर्मचारी संघटनेचे बी.एन.शिरसाठ, एस.पी.पाटील, एस.एस.शेख, डी.एच.बोरसे, एस.आर. सहाटे, वाय.सी.मुस्कावट, एम.बी.सपकाळे, रूपाली गुरव, एस.सी.तायडे एस.एन. नागरे आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.




