मुलींना इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात करीयर करण्याची मोठी संधी
डॉ.गिरीष कुळकर्णी : इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकॉम इंजिनियर्स असोसिएशनची बैठक
भुसावळ : जागतिक बाजारपेठांच्या दृष्टीने भारत आज इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम मार्केट दुसर्या स्थानावर असून गेल्या दहा वर्षांच्या काळात आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासाच्या तुलनेत टेलिकॉम सेक्टरने गरुडझेप घेतलेली आहे. विशेषतः ग्रामीण क्षेत्रांमध्ये कनेक्टिव्हिटीच्या अडचणी, विजेचा अभाव, साक्षरतेची पातळी निम्न असूनही मोबाईल फोन मात्र अतिशय मोठ्या प्रमाणात वापरला जाताना दिसतो. ‘भारताची अफाट लोकसंख्या’ आणि ‘ग्रामीण भारत’, या दोन्ही शब्दांनी दूरसंचार क्षेत्राच्या भारतातील वाढीमध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. अनेक विदेशी कंपन्या आज भारतात पैसा गुंतवण्यासाठी आतुर आहेत, याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे भारतात उपलब्ध असलेली प्रचंड प्रमाणातील मागणी हे आहे त्यामुळे मुलींना इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम क्षेत्रात करीअर करण्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध आहेत, असे मत डॉ.गिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकॉम इंजिनियर्स असोसिएशनच्या बैठकीत ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकॉम इंजिनियर्स असोसिएशनचे सदस्य प्रा.अनंत भिडे, प्रा.धीरज अग्रवाल, प्रा.सुलभा शिंदे, प्रा.गजानन पाटील, प्रा.दीपक खडसे, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.दीपक साकळे, प्रा.धीरज पाटील व माजी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
इलेक्ट्रॉनिक्समध्ये मुलींचे भविष्य चांगले
टेलिकम्युनिकेशमुळे डिजिटल संवाद माध्यमांचे महत्त्व पटले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या अभ्यासक्रमांनंतर आजच्या तांत्रिक युगात नोकरी किंवा स्वतंत्र व्यवसायाला मोठा वाव आहे. सध्या टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये मुलींचे भविष्य चांगले आहे. त्यातील नव्या ट्रेंडविषयी उत्सुकता असल्यामुळे सतत अपडेट राहता येते अशी माहिती, डॉ.कुळकर्णी यांनी दिली.
इलेक्ट्रॉनिक्स सोबत टेलिकॉमचे शिक्षण ठरते उपयुक्त
इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चर (उत्पादन), ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री आणि सेवा (सेल्स अॅण्ड सर्व्हिस) आदी संबंधित काम करावं लागतं. कामाच्या या संधी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरला खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रात मिळू शकतात. या इंजिनिअर्सना मायक्रोप्रोसेसर्स, फायबर ऑप्टिक्स आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टीम्स जसं की टीव्ही, रेडिओ आणि टेलिफोन यांच्याशी संबंधित काम करावं लागतं. एटंरटेमेंट ट्रान्समिशन (मनोरंजन प्रसारण) इंडस्ट्री, रीसर्च एस्टॅब्लिशमेंट्स (संशोधन आस्थापन) आणि संरक्षण क्षेत्रात मुलींना रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत म्हणून इलेक्ट्रॉनिक्स सोबत टेलिकॉमचे शिक्षण उपयुक्त ठरते, असे प्रा.अनंत भिडे म्हणाले.
उद्योजक बनण्याची संधी
स्मार्टफोन व डिजिटल युगात इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. त्यामुळे इंजिनिअरींग क्षेत्राचा करीअर म्हणून विचार करणार्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी एक खूणगाठ पक्की बांधली पाहिजे. देशात उपग्रह, इंटरनेट आणि मोबाइल टेलिफोन क्षेत्रात झालेल्या विकासामुळे टेलिकॉम इंजिनियर्सची मागणी जास्त आहे. केंद्र आणि राज्य सरकारी नोकरीसह उद्योजक बनण्याची संधी या शाखेतून आहे, असे माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधी निकिता बोरोले यांनी सांगितले.

