मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी
फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांचे मतदारांना आवाहन
फैजपूर- रावेर विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून या विधानसभा मतदार संघातील मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी, असे आवाहन रावेर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे. रावेर लोकसभा मतदार संघात सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये एकूण दोन लाख 97 हजार 152 इतके मतदार होते. त्यामध्ये पुरुष मतदार एक लाख 54 हजार 537 व स्त्री मतदार एक लाख 42 हजार 614 इतके होते.
दोन हजार नवमतदारांची नोंदणी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीनंतर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2 राबविण्यात आला. या कार्यक्रमातंर्गत दोन हजार 34 इतक्या नवमतदारांची नोंदणी करण्यात आली असून सहाहजार 468 मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यात मयत चार हजार 836, दुबार 984 व स्थलांतरीत 648 असे मतदार आहे. 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार रावेर विधानसभा मतदार संघाची एकूण मतदार संख्या दोन लाख 92 हजार 763 इतकी आहे. त्यात पुरुष मतदार एक लाख 51 हजार 786 इतके असून स्त्री मतदार एक लाख 40 हजार 977 इतके आहे.
मतदार राहू नये मतदानापासून वंचित
सर्व यादी भागाच्या मतदार याद्या त्या-त्या यादी भागाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे प्रसिद्धी कामी देण्यात आलेल्या आहेत. सर्व मतदारांनी आपापल्या यादी भागाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे संपर्क साधावा. अथवा व्होटर हेल्पलाईन अॅपद्वारे आपले नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी जेणेवरुन कुठलाही मतदार हा विधानसभा निवडणूक 2019 मध्ये आपल्या मतदानाच्या मुलभूत अधिकारापासून वंचित राहणार नाही, असे डॉ.अजित थोरबोले यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.