काकांपासून ताटातूट झालेल्या पुतण्याची भुसावळात पोलिसांनी घडवली भेट


भुसावळ : गुन्हेगारांसाठी नेहमीच कर्दनकाळ ठरणार्‍या खाकीतील पोलिसांमध्ये माणुसकीचा पाझर ओतप्रोत भरलेला असतो याचा अनुभव भुसावळकरांना शुक्रवारी आला. मातृ-पितृ छत्र काळाने हिरावून घेतल्यानंतर काकांकडे राहणार्‍या दहा वर्षीय चिमुकल्याची भुसावळातील गर्दीत ताटातूट झाली मात्र कर्तव्यावरील खाकीने अवघ्या काही तासात तपासचक्र फिरवून काकांचा शोध लावत चिमुकल्याची काकांशी भेट घडवूत आणत कर्तव्य दक्षतेचा प्रत्यय दिला. वडील रूपी काकांच्या आठवणीत रडून-रडून व्याकूळ झालेल्या दहा वर्षीय पुतण्याने काकांना पाहताच त्यांना कडाडून मिठी मारताच कर्तव्याप्रती कठोर असलेल्या पोलिसांना गहिवरून आले नाही तर नवलच !

भुसावळात खाकीने दिला कर्तव्य दक्षतेचा प्रत्यय
झाले असे की, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दहा वर्षीय चिमुकला बसस्थानकावर एकटाच रडत असल्याचा फोन बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांना येताच त्यांनी एएसआय तस्लीम पठाण, कृष्णा देशमुख हवालदार मिलिंद कंक, वाल्मीक सोनवणे, संदीप परदेशी, सुभान तडवी, रमण सुळकर, किशोर मोरे, सचिन चौधरी यांना रवाना केले. पोलिस कर्मचार्‍यांनी चिमुकल्याची विचारपूस केली असता तो अधिक घाबरल्याने त्यास नाव-गावही सांगता येत नव्हते त्यामुळे पोलिसांना त्याला पोलिस ठाण्यात आणत शांत केले. चिमुकल्याने गावाचे नाव व पत्ता सांगितल्यानंतर पोलिसांनी खबर्‍यांना कामाला लावता चिमुकल्याचे नाव रोहन विकास सुरवाडे (10, रा.भीमनगर, मलकापूर, जि.बुलढाणा) असल्याचे निष्पन्न केले. चिमुकल्याचे आई-वडीलांचे निधन झाले असून तो आपल्या काकांकडे मलकापूर येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुलाचे काका विजय गणपत सुरवाडे (42) यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बाजारपेठ पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. गेल्या काही तासांपासून रडून-रडून व्याकूळ झालेला चेहरा वडिलरूपी काकांना पाहताच फुलला व चिमुकल्यांना आपल्या काकांना मिठी मारताच खाकीतील पोलिसांनी कर्तव्याप्रती समाधान व्यक्त केले. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर पूर्तता करून बालकाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !