किनगावला जुन्या वादातून हाणामारी : पती-पत्नी जखमी


यावल : तालुक्यातील किनगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून पती, पत्नीस लाकडी दांड्याने व लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी परस्पर जखमीविरूध्द विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

जुन्या भांडणातून हाणामारी
किनगाव, ता.यावल येथील प्रदीप इच्छाराम कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावात 14 जानेवारी रोजी रात्री जुन्या भांडणावरून भावलाल पुंडलिक ठाकूर, सतीश भावलाल ठाकूर, अमोल ठाकूर आणि इतर अन्य अनोळखी दोघांनी (रा.किनगाव) प्रदीप कोळी यांच्या घरात घुसून लाकडी दांड्याने व सतीश भाऊ ठाकूर याने लोखंडी रॉडने प्रदीप कोळी यांच्या डोक्यात व यांची पत्नी संगीता प्रदीप कोळी हिच्या डोक्यात वार करीत त्यांना मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. दोघा जखमींना किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून जळगाव हलविण्यात आले व तेथे जिल्हापेठ पोलिसांनी जबाब घेत शनिवारी यावल पोलिसात गुन्हा दाखल केला. यातील संशयीत आरोपी भावलाल पुंडलीक ठाकूर, सतीश भावलाल ठाकुर व अमोल ठाकूर यांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघा आरोपींना यावल येथील प्रथमवर्ग न्यायालयात न्यायधीश डी. जी. जगताप यांच्यासमोर उभे केले असता त्यांना 20 जानेवारी पर्यंतची पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे. दरम्यान, दोघं अनोळखींचा पोलिस शोध घेत आहेत.


परस्पर विरूध्द गुन्हा
याच कारणावरून प्रदीप ईच्छाराम कोळी यांनी एका 23 वर्षीय फिर्यादी महिलेसोबत असलेल्या तरुणीस रस्त्याने जातांना धक्का मारून तिचा हात धरून तरुणीच्या मनास लज्जा वाटेल, असे कृत्य केल्याने प्रदीप कोळीविरूध्द विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सुनील तायडे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !